Maharashtra

“हे फडणवीस असो की नाना फडणवीस, काय बोलणार हे सांगायची गरज नाही”- शरद पवार

By PCB Author

September 21, 2019

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकला काय बोलले त्याने काही फरक पडत नाही. ते काहीही बोलू शकतात, कारण नागपूरचे त्यांच्यावरच संस्कारच हे आहेत. हे फडणवीस काय? नाना फडणवीस काय, कुठलेही फडणवीस काय बोलणार हे सांगण्याची गरज नाही. मात्र पंतप्रधान जे काही बोलले ते त्यांनी बोलायला नको होते” असे म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

“विकासाचा प्रश्न येतो तेव्हा कुणाचा हात धरुन जावे असा प्रश्न पुढे येतो, त्यावेळी शरद पवार हेच नाव माझ्यासमोर येते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. कधी म्हणता माझी करंगळी धरुन चालता, मग निवडणूक जवळ आली की असे का बोलता? हे वागणे योग्य नाही” असेही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावले आहे. ” पंतप्रधान काहीही बोलण्याइतके कर्तृत्त्ववान आहेत. मलाही बोलता येते पण मी बोलणार नाही. त्याचे कारण पंतप्रधान ही एक संस्था आहे. हे पद लोकशाहीतील महत्त्वाचे पद आहे. या पदाची अप्रतिष्ठा मला होऊ द्यायची नाही म्हणून मी शांत आहे ” असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

” महाराष्ट्राने मला भरभरुन दिले आहे. माझी आता कोणतीही इच्छा नाही. जनतेने मला चारवेळा मुख्यमंत्री केले. देशाचा संरक्षण मंत्री केले १० वर्षे कृषीमंत्री केले. जनतेने मला भरभरुन दिले. आता आणखी काहीही नको. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे ” असेही शरद पवार यांनी बोलून दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. ” पाकिस्तानचे सत्ताधारी पंतप्रधान, राष्ट्रपती, सैन्याधिकारी सगळेच पाकिस्तानच्या जनतेची फसवणूक करतात, हे मी बोललो मात्र मोदींनी काय सांगितले की मी पाकिस्तानची स्तुती केली. ही काय पाकिस्तानची स्तुती आहे का? ” असाही प्रश्न शरद पवार यांनी विचारला.