‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय’

0
625

सोलापूर, दि. १३ (पीसीबी) : सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, अशी गर्जना करणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लोकगायक आनंद शिंदे यांनी गाण्यातून टोला हाणला. ‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय’ असा इशारा आनंद शिंदेंनी दिला. मित्र भारत भालके यांच्या प्रेमाखातर आनंद शिंदे हे त्यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सोमवारी मंगळवेढ्यात आले होते.

भारत भालकेंशी मैत्रीपूर्ण संबंध
आनंद शिंदे हे मूळचे मंगळवेढ्याचे आहेत. त्यांचे आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालेल्या भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी आनंद शिंदेंनी मंगळवेढ्यात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी स्वर्गीय भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा देताना भगीरथ भालके यांना निवडून आणण्याचे आवाहन शिंदेंनी केले.

फडणवीसांच्या वक्तव्याचा गाण्यातून समाचार
आनंद शिंदे यांच्या सभेच्या आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवेढ्यात सभा झाली होती. त्या सभेत फडणवीस यांनी सरकार पाडण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. तोच धागा पकडत गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता ‘त्यांना सांगायचंय मला’ असे म्हणत फडणवीसांच्या वक्तव्याचा एका गाण्याच्या माध्यमातून समाचार घेतला.
काय होत्या गाण्याच्या ओळी? –
तुम्ही चिडवताय,
आम्ही चिडणार नाय.
तुम्ही लय काय करताय,
तसं काय घडणार नाय.
तुम्ही रडवताय
पण आम्ही रडणार नाय.
हे पवार साहेबांचं सरकार हाय,
तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय.

आनंद शिंदे यांनी हे गाणे वाचताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला. यावेळी धुरळा चित्रपटातील ‘नजर धारदार माणूस दमदार’ हे गाणे गात शिंदे यांनी भगीरथ भालके यांच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारही उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

‘लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो..पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे’, अशा शब्दात फडणवीसांनी महाविसार आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त कोट्यातील 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली होती. यामध्ये राष्ट्रवादीकडून आनंद शिंदे यांचं नाव देण्यात आलं आहे. आपल्या खर्ड्या आवाजाने मैफिली गाजवणारे शिंदे आता विधीमंडळातही आवाज उठवताना दिसतील. मात्र या यादीवर अद्याप राज्यपालांनी शिक्कामोर्तब केलेला नाही.