हे देवाचे सरकार; विरोधकांसाठी येणार ‘न्यायाचा दिवस’- कुमारस्वामी

0
448

बंगळुरू, दि. २० (पीसीबी) – कर्नाटकचे काँग्रेस-जेडीएसचे आघाडी सरकार हे देवाचे सरकार असून योग्य न्याय करण्यासाठी ‘न्यायाचा दिवस’ येणार आहे , अशा शब्दांत राजकीय पेचात सापडलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बायबलचा हवाला विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ‘आमच्या आघाडीला दैवाने सत्तेवर बसवले असून विरोधकांना दैव नक्कीच शिक्षा करेल’, असा थेट इशाराच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विरोधकांना दिला आहे.

विधानसभेत बोलताना कुमारस्वामी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. आमचे सरकार पाडण्यासाठी आमचे आमदार त्यांच्या बाजूने वळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने चुकीचे मार्ग अवलंबल्याचा आरोपही कुमारस्वामी यांनी केला. या वेळी बोलताना कुमारस्वामी यांनी बायबलमधील न्यायाच्या दिवसाचा (जजमेंट डे) आवर्जून उल्लेख केला. एक दिवस प्रत्येकाला सर्वशक्तिमान ईश्वरापुढे आपल्या कर्माचा पाढा वाचावाच लागतो. तो न्यायाचा दिवस असतो. तिथे ना वकील असतो, ना खोटे चालते, ना मुखवटा कामी येतो. ईश्वरापुढे आपल्या कर्माचे खरेखुरे मोजमाप होते, असे म्हणत कुमारस्वामी यांनी भारतीय जनता पक्ष ‘पाप’ करत असून त्यानुसार त्यांना नक्कीच फळ मिळेल असे सूचित केले आहे.