Pune

हेल्मेट सक्तीविरोधात पोलीस आयुक्तालयावर गुरूवारी पुणेकरांची दुचाकी रॅली

By PCB Author

January 02, 2019

पुणे, दि. २ (पीसीबी) – हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीने ‘सविनय कायदेभंगा’ची भूमिका घेतली असून    गुरुवारी (दि. ३) पोलिस आयुक्तालयावर हेल्मेट न घालता दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाजवळून ही रॅली काढण्यात येणार  आहे. यावेळी पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर शहरातील सर्व आमदार, खासदारांना त्यांच्या मोबाइलवर हेल्मेट सक्ती रोखण्यासाठी विनंती करण्याचे ‘मेसेज’स पाठविण्यात यावेत, असे आवाहन कृती समितीने नागरिकांना  केले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत हेल्मेट सक्तीविरोधात शहरात वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी नवीन वर्षांत हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधातील कारवाईची दिवसेंदिवस धार वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने मंगळवारी घेतलेल्या बैठकीत सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला आहे.  या बैठकीत या कारवाईविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.