हॅकरने असे केले पुण्यातील कॉसमॉस बँकेतून ९४ कोटी गायब; व्हिसा कंपनीमुळे समोर आला प्रकार

858

पुणे, दि. १४ (पीसीबी) – कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड रोडवरील सर्व्हरवर सायबर हल्ला करुन हॅकरने बॅंकेला तब्बल ९४ कोटीचा गंडा घातला असून दोन दिवसांच्या कालावधीत हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशखिंड रोडवर कॉसमॉस टॉवर येथे बँकेचे मुख्यालय आहे. शनिवारी (दि.११ ऑगस्ट) या मुख्यालयातील सर्व्हरवर मालवेअरचा हल्ला झाला होता. बँकेच्या काही व्हिसा व रुपी डेबीट कार्डधारकांची माहितीही चोरण्यात आली. या व्हिसांमार्फतचे २५ देशातून १५ हजार व्यवहार करून तब्बल ८० कोटी रुपये काढण्यात आले. शनिवारी दुपारी ३ पासून रात्री १० पर्यंत हे पैसे काढले जात होते. त्यानंतर रविवारी कोणतीही हालचाल झाली नाही. पण पुन्हा सोमवारी दुपारी हॅकरने बँकेतून १३ कोटी रुपये काढले. हाँगकाँगमधील एका खात्यात ते लगेच वळवण्यात आले. ही रक्कम हॉंगकॉंगमधील खात्यात डिपॉझिट होताच काढूनही घेण्यात आली.

दरम्यान शनिवारी इतक्या मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यवहार होत असल्यामुळे व्हिसा कंपनीला यात काहीतरी घोळ असल्याची शंका आली. ही बाब व्हिसा कंपनीने रिझर्व बँकेच्या लक्षात आणून दिली. रिझर्व बँकेने कॉसमॉस बँकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या. तेव्हा हा प्रकार समोर आला. त्यानंतर झालेल्या सर्व व्यवहारांवर कॉसमॉस बँकेने नजर ठेवली आणि हॅकरने सर्व्हरवर हॅक करुन बँकेला ९४ कोटींचा गंडा घातल्याचे समोर आले. हॉंगकाँगमध्ये पैसे वळवले गेल्यावर लगेच कॉसमॉस बँकेने चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती आणि हाँगकाँग मधील एएलएम ट्रेडिंग कंपनीवर गुन्हा दाखल केला. चतु:श्रुंगी पोलिस तपास करत आहेत.