हुक्का पार्लर चालविल्या प्रकरणी ‘त्या’ हॉटेलवर 33 दिवसात दोनदा कारवाई

0
891

हिंजवडी, दि. २ (पीसीबी) – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयरामनगर येथे असलेल्या H2O हॉटेलवर पोलिसांनी 33 दिवसात दोन वेळा छापे मारले. दोन्ही वेळेला हजारोंचा मुद्देमाल जप्त करून हॉटेल चालकावर कारवाई केली. मात्र पहिल्यांदा कारवाई केल्यानंतर आरोपीने सुधारण्याऐवजी तोच गोरखधंदा सुरू ठेवला. यामुळे अवैध धंदे करणा-यांमध्ये पोलिसांचा वचक राहिला नाही अथवा हे सर्व पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

1 जानेवारी 2022 रोजी H2O हॉटेलमध्ये जुनेद अन्सारी व तुषार सबलोक यांनी हॉटेलमधील टेरेसवर विनापरवाना अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोखंडी पत्र्याचे शेड मारुन टेबल खुर्च्या लावून तिथे लोकांची गर्दी जमवली. लोकांना प्रतिबंधीत तंबाखूजन्य हुक्का पिणेस जागा उपलब्ध करुन हुक्का विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर खुद्द पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्यांच्या पथकासोबत मध्यरात्री हॉटेलवर छापा टाकला.

आरोपी जुनेद आणि तुषार यांनी जमावबंदी आणि कोरोना साथीच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून हॉटेल सुरू ठेवले आणि ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पुरवला असल्याचे या छाप्या दरम्यान निदर्शनास आले. पोलिसांनी रोख रक्कम, हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट आणि इतर साहित्य असा एकूण दोन लाख 39 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हॉटेल मालक तुषार प्रमोद सबलोक (वय 34, रा. मारुंजी, हिंजवडी), हॉटेल चालक जुनेद असगर अन्सारी (वय 34, रा. मिठानगर, कोंढवा, पुणे), बार टेंडर सुरेश गंगाजल राठोड (वय 26), कॅप्टर अशराफुल आसान शेख (वय 23), वेटर दिवाकर श्रीमहेश झा (वय 36), राखीबुल इसराफुल शेख (वय 22), छोटन लालमोहम्मद शेख वय 25, चौघे रा. जयरामनगर, हुलावळे चाळ, हिंजवडी) यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हॉटेलमध्ये गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 61 इसमांवर प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहाय्यक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, सुनिल शिरसाट, संतोष बर्गे, स्वप्निल खेतले भगवंता मुठे, अमोल साडेकर, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, संगिता जाधव, अतुल लाखंडे, योगेश तिडके, सोनाली माने, अमोल शिंदे, सुमित डमाळ यांनी केली आहे.

H2O हॉटेलवर 28 नोव्हेंबर 2021 रोजी हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली होती. त्यावेळी सहा हजारांचे चार हुक्का पॉट, चार हुक्का पाईप तसेच सहा हजार 170 रुपयांचे चार हुक्का फ्लेवर बॉक्स असा एकूण 12 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. तसेच जुनेद असगर अली अन्सारी याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता. ही कारवाई झाल्यानंतर अवघ्या 33 दिवसांनी पुन्हा त्याच हॉटेलवर पोलिसांनी कारवाई केली आहे. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुन्हा त्याच आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. एका महिन्यात आरोपीने पुन्हा अवैध धंद्याचा गोरखधंदा सुरू केला. यामुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांमधील पोलिसांचा धाक कमी होत असल्याचे बोलले जात आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे फिल्डवर उतरून कारवाई करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र जेंव्हा आपल्या शहर पोलीस प्रमुखाला रस्त्यावर येऊन कारवाया कराव्या लागत असतील तर अन्य पोलीस आणि डझनभर पथके काय करतात. थेट पोलीस आयुक्तांना आरोपींची, अवैध धंद्यांची टीप मिळते पण स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्याचा मागमूसही लागत नाही, अशा वेळी नेमकं कोण कमी पडतंय? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो. सांगवी येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी चाकणजवळ असल्याचे पोलीस आयुक्तांना समजले होते. त्यानंतर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चार पथकांनी कारवाई करून आरोपींना पकडले खरे पण आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलीस आयुक्तांचा हात अजूनही फ्रॅक्चर आहे. त्यानंतर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त स्वतः हॉटेलवर जाऊन छापा मारला. यामुळे पोलिसांमध्ये ऊर्जा, उत्साह कदाचित निर्माण होत असेलही. पण शहरात असलेला हजारोंचा पोलीस फौजफाटा सोडून आयुक्तांना कारवाई करावी लागते हा न उलगडणारा पेच आहे.