हुंड्यासाठी माजी मंत्री संगीता यादव यांना सासरच्या लोकांनी जिवंत जाळले

0
3186

बदलापूर, दि. १७ (पीसीबी) – उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या माजी मंत्री संगीता यादव यांना हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.१६) रात्री उशीरा बदलापूर ठाणे परिक्षेत्रातील विठू वाकला येथे घडली. सध्या संगीता यांची स्थिती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी बदलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी सासरा फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशीरा समाजवादी पक्षाच्या माजी मंत्री संगीता यांना त्यांच्या राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. सासरकडच्यांनी हुंड्याच्या मागणीतून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. संगीता यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सासू-सासऱ्यांनी त्यांना एका खोलीत बोलावून त्यांचे हात बांधले. यानंतर त्यांना रॉकेल ओतून पेटवून दिले. दुसऱ्या खोलीत झोपलेल्या संगीता यांच्या मोठ्या जाऊबाईंनी त्यांच्या किंकाळ्या ऐकून खोलीकडे धाव घेतली. यानंतर कशीबशी आग विझवून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  या घटनेनंतर त्यांचा सासरा घरातून फरार झाला आहे. बदलापूर पोलिस तपास करत आहेत.