Desh

ही घ्या १५ बिगर नेहरु-गांधी अध्यक्षांच्या नावांची यादी; चिदंबरम यांचे मोदींच्या टीकेला उत्तर  

By PCB Author

November 17, 2018

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – गांधी कुटुंबाबाहेरील एखाद्या व्यक्तीला ५ वर्षांसाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष करुन दाखवावे, हे पंतप्रधान मोदी यांनी दिलेले आव्हान काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी स्वीकारत  १५ बिगर नेहरु-गांधी अध्यक्षांच्या नावांची यादीच त्यांनी वाचून दाखवली. त्यानंतर मोदींनी  राफेल करार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्यावर उत्तर द्यावे, असे प्रतिआव्हान चिंदबरम यांनी दिले. 

मोदींची स्मरणशक्ती कमजोर आहे, असा टोला लगावत चिदंबरम यांनी सलग ट्विट करत अध्यक्षांची नावेच सांगितली. तसेच काँग्रेसला स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लालबहादुर शास्त्री, के कामराज आणि मनमोहन सिंग यांसारख्या सामान्य पार्श्वभूमीचे नेते आणि स्वातंत्र्यापूर्वीच्या हजारो नेत्यांवर गर्व असल्याचे ते म्हणाले. मी मोदींचे आभार मानतो. कारण काँग्रेस अध्यक्ष कोणाला निवडले जाते याची त्यांना चिंता आहे. त्यांच्याकडे यावर बोलायला भरपूर वेळ आहे, असा निशाणाही त्यांनी यावेळी साधला.

पंतप्रधान मोदींची स्मरणशक्ती ठीक करण्यासाठी १९४७ नंतर काँग्रेस अध्यक्ष आचार्य कृपलानी, पट्टाभि सीतारमैय्या, पुरुषोत्तमदास टंडन, यू एन धेबर, संजीव रेड्डी, कामराज, निजलिंगप्पा, सी सुब्रमण्यम, जगजीवनराम, शंकरदयाळ शर्मा, डी के बरुआ, ब्रह्मानंद रेड्डी, पी व्ही नरसिंह राव आणि सीताराम केसरी अशी यादीच त्यांनी वाचून दाखवली.