“हिंदू-मुस्लीम यांच्यात तणाव निर्माण करणं हेच या लोकांचं राजकारण आहे“

0
218

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) : पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील काही महत्त्वाचे नेतेमंडळी भाजपामध्ये गेले आहेत. तशातच असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षानेही बंगालमध्ये निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमला भाजपाने पैसे देऊन मुद्दाम बंगालमध्ये निवडणुका लढवण्यास प्रवृत्त केलं आहे आणि मुस्लीम मतांचं हे राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपा आणि एमआयएम यांची छुपी युती असल्याचे दोन्ही पक्षांवर आरोप होत असताना भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री शाहनवाझ हुसेन यांनी मात्र एमआयएमवर टीका केली आहे.

रिपब्लिक टीव्हीवरील चर्चासत्राच्या कार्यक्रमात सूत्रसंचालक अर्णब गोस्वामी यांनी वारिस पठाण यांना हिंदू-मुस्लीम मुद्द्यावरून राजकारण न करण्याची शपथ घ्या असं आवाहन केलं. या विषयावर बोलताना शाहनवाझ हुसेन यांनी वारिस पठाण यांच्यावर टीका केली. “(एमआयएम) हा रझाकारांचा पक्ष आहे. हे केवळ मुस्लीम लोकांचाच विचार करतात. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातदेखील हे लोक राजकारण करण्यात व्यस्त होते. १५ मिनिटं पोलीस हटवा, आम्ही हिंदूंना बघून घेऊ अशी वक्तव्य करणारे लोक कायमच धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. हिंदू-मुस्लीम यांच्यात तणाव निर्माण करणं हेच या लोकांचं राजकारण आहे”, अशा शब्दात हुसेन यांनी वारिस पठाण यांच्यावर सडकून टीका केली.

दरम्यान, याआधी रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी वारिस पठाण यांना हिंदू मुस्लीम मुद्द्यावर राजकरण न करण्याची शपथ घेण्यास सांगितलं. त्यावर वारिस पठाण यांनी त्यांच्या पक्षाची बाजू मांडली. “आम्ही जर विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली तर त्यात चूक काय? आम्ही केलेली विकासकामं आम्ही जनतेसमोर ठेवू. जनतेला एक सक्षम पर्याय मिळत असेल तर त्यात गैर काय? जर आम्ही निवडणूक लढवावी असं बंगालमधील लोकांनाच वाटत असेल, तर त्यात काही चुकीचं नाही”, असं वारिस पठाण म्हणाले.