Pune

हिंदू जनजागृती समितीने मानवी साखळी आणि प्रबोधनाने रोखले खडकवासला धरणाचे प्रदूषण

By PCB Author

March 21, 2019

पुणे, दि. २१ (पीसीबी) – धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून पाण्यात उतरणाऱ्यांमुळे होणारे खडकवासला धरणाचे प्रदूषण रोखले जावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली गुरूवारी (दि. २१) खडकवासला जलाशय रक्षण अभियान राबवण्यात आले. या अभियानाचे यंदाचे १७ वे वर्ष आहे.

या अभियानामध्ये समितीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी, कमिन्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे कर्मचारी सहभागी झाले होते. प्रबोधनात्मक फलक हातात धरून सकाळी ९ पासून सायंकाळपर्यंत जलाशयाभोवती मानवी साखळी करण्यात आली. रंगाने माखलेल्या युवक-युवतींचे प्रबोधन करून त्यांना धरणाच्या पाण्यात उतरण्यापासून प्रतिबंध करण्यात आला. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी हे अभियान १०० टक्के यशस्वी झाले. पोलिसांनीही या अभियानाला सहकार्य केले. अशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे २५ मार्चला हे अभियान राबवण्यात येणार आहे.

जलदेवतेला प्रार्थना करून आणि भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून या अभियानाला सुरूवात करण्यात आली. हभप विद्यानंद सांगळे महाराज, उपसरपंच सीमा मते, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष शांताराम मते, पाटबंधारे विभागाचे धुंडीराम भागवत, ग्रामपंचायत सदस्य आशा मते, हभप ज्ञानेश्‍वर महाराज मते, हभप दशरथ मते, सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव, हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले आदी उपस्थित होते. पाटबंधारे विभागाच्या वतीने धरण परिसरात सूचनात्मक रिक्षाही फिरवण्यात आली. या माध्यमातून प्रशासनाच्या वतीने रंग खेळून पाण्यात उतरण्यास प्रतिबंध असल्याविषयी जागृती करण्यात येत होती. सामाजिक बांधिलकी म्हणून गेली १६ वर्षे सातत्यपूर्ण अभियान राबवण्यात येत आहे. धर्मशिक्षणाच्या अभावी सणांच्या निमित्ताने उत्सवांमध्ये शिरलेले अपप्रकार दूर होण्याची आवश्यकता आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी व्यक्त केले.