हिंदी भाषा कोणावरही थोपवली जाऊ शकत नाही- रजनीकांत

0
653

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – हिंदी भाषा कोणावरही थोपवली जाऊ शकत नाही, असे मत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकारणी रजनीकांत यांनी व्यक्त केले आहे. केवळ तामिळनाडूच नव्हे तर दक्षिण भारतातले कुठलेच राज्य हे स्विकारणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी अभिनेते आणि राजकारणी कमल हासन यांनीही हिंदी भाषा कोणावरही थोपवली जाऊ शकत नाही असे म्हटले होते. हिंदी भाषा दिनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक देश, एक भाषा’ ही भुमिका मांडली होती. त्यावरुन हा वाद पेटला आहे.

रजनीकांत माध्यमांशी बोलताना म्हणाले, “हिंदी भाषा थोपवली जाऊ शकत नाही. केवळ तामिळनाडूच नव्हे तर दक्षिण भारतातील सर्व राज्ये याचा विरोध करतील. केवळ हिंदीच नव्हे तर इतर कोणतीही भाषा कोणावरही थोपवली जाऊ शकत नाही. देशाची एकता आणि विकासासाठी एखादी सामाईक भाषा असणे चांगले आहे मात्र, भाषा थोपवणे स्विकारार्ह नाही.”

दरम्यान, कमल हासन यांनी एका व्हिडिओद्वारे अमित शाह यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, “भारत १९५० मध्ये ‘विविधतेत एकता’ या आवाहनासोबत प्रजासत्ताक बनला होता. त्यानंतर आता कुठलाही शाह, सुल्तान किंवा सम्राट याचा इन्कार करु शकत नाही. जल्लीकट्टूच्या समर्थनार्थ आम्ही केवळ आंदोलन केले होते. आता तर आमच्या भाषेसाठीची लढाई यापेक्षा अनेक पटींनी तीव्र असेल. देशाचे राष्ट्रगीतही बंगाली भाषेत आहे, हे कशाचे प्रतिक आहे. भारत एक संघराज्य आहे. त्यामुळे इथे आम्ही सर्वजण एकत्र बसतो आणि खातो. आम्हाला बळाचा वापर करुन कोणीही खाऊ घालू शकत नाही.”