Banner News

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन

By PCB Author

December 18, 2018

पुणे, दि. १८ (पीसीबी) – देशभरात सध्या विकासाचे वारे वाहत आहे. या विकासाच्या महामार्गावर कोणालाच अस्पृश्य  ठेवता कामा नये. कोणालाच वाहतुकीत वेळ घालवायचा नाही. गावापासून शहरापर्यंत पायाभूत विकास कसा होईल, याकडे आमच्या सरकारचे लक्ष आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) येथे केले.  

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मार्फत करण्यात येणाऱ्या  हिंजवडी ते शिवाजीनगर  मेट्रो ३ मार्गिकेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यपाल के. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याचे महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव आदी  उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी आपल्या भाषणाची मराठीतून सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, महात्मा ज्योतिबा फुले आणि महर्षी कर्वे यांची भूमी आणि बाळासाहेब ठाकरे, लोकमान्य टिळक यांची जन्मभूमी असलेल्या पुण्याला मी वंदन करतो. मला पुणे आणि महाराष्ट्राच्या जनतेने प्रेम दिले आहे. मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही येथे एकत्र आला आहात. याबद्दल मी तुमचा आभारी आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी पंतप्रधानांनी मराठीमध्ये भाषणाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे यांना अभिवादन केले. तर पुणे हे लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश गोखले यांच्यासह बाळासाहेब ठाकरेंची जन्मभूमी  आहे, असा आवर्जून उल्लेख पंतप्रधानांनी केला.