हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रात हाय अलर्ट जारी

1014

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रात केंद्रीय सुरक्षा बलाने हाय अलर्ट जारी केला आहे. हिंजवडी येथील देशी विदेशी कंपन्यांना दहशवाद्यांकडून टार्गेट केले जाऊ शकते यामुळे हा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज (सोमवार) पुलवामा येथील पिंगलानमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात पुन्हा चकमक झाली. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले आहेत. तर गुरुवारी (दि. १४) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. हिंजवडी आयटी हब हे देशातील महत्वाचे आयटी हब आहे. येथे अनेक देशी विदेशी कंपन्या आहेत. ज्यामध्ये देशातील आणि विदेशातील नागरिक कामाला आहेत.

दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी काही दुचाकीस्वार पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले असल्याचे बोलले जात होते. यामुळे या परिसराला दहशतवादी संघटनांकडून धोका असल्याचे दिल्लीच्या गुप्तचर यंत्रणांकडून सांगण्यात आले. या क्षेत्राला सुरक्षीत ठेवण्यासाठी केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांच्या तुकड्या हिंजवडी परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक पोलीसांनीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून परिसरात जा-ये करणाऱ्या वाहनांची आणि लोकांची कसून तपासणी केली जात आहे.