Chinchwad

हिंजवडीत वाहन चालकाकडून हप्ता मागणाऱ्या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले अटक

By PCB Author

February 13, 2019

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – प्रवासी वाहन चालविण्यासाठी वाहन चालकाकडून हप्ता मागणाऱ्या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १२) हिंजवडी वाहतूक विभाग कार्यालयासमोर करण्यात आली.

भालचंद्र संदीपान कानडे (वय ३८, रा. शिंदे वस्ती, म्हारुंजी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय वाहन चालकाने तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे हिंजवडी वाकड परिसरात चालणारी प्रवासी वाहने आहेत. आरोपीने त्यांच्याकडे हद्दीत वाहन चालविण्यासाठी दोन वाहनांसाठी दर महिन्याला १३०० रुपये देण्याचे सांगितले. त्याप्रमाणे आरोपीने दोन वाहनांसाठी पाच महिन्यांचे ६ हजार ५०० रुपये मागितले. ताडजोडीअंती दोन महिन्यांचे पैसे देण्याचे ठरले, हे पैसे देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी सापळा रचून आरोपी भालचंद्र याला रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक तपास करत आहेत.