Chinchwad

हिंजवडीत रिक्षामधून आलेल्या चोरट्यांनी बसची वाट पाहत असलेल्या तरुणाला लुटले

By PCB Author

July 08, 2019

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – बस स्टॉपवर बसची वाट पाहत असलेल्या तरुणाकडील १० हजारांचा मोबाईल आणि रोख ५५० रुपये रिक्षामधून आलेल्या दोघा चोरट्यांनी जबरदस्तीने काढून नेले. ही घटना शनिवारी (दि.६) रात्री एकच्या सुमारास हिंजवडी बस स्टॉपवर घडली.

याप्रकरणी गणेश बाळासाहेब मस्कर (वय १८, रा. आनंदपार्क लेन क्र.२, थेरगाव, मुळ रा. पांढऱ्याची वाडी ता.जि.बीड) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री एकच्या सुमारास गणेश हा हिंजवडी बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभा होता. यावेळी एका रिक्षामधून आलेले दोघे चोरटे त्याच्या जवळ आले. तसेच त्याच्या खिशातील १० हजारांचा मोबाईल आणि रोख ५५० रुपये जबरदस्तीने काढून घेत पळ काढला. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. हिंजवडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.