हिंजवडीत प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद; हिंजवडी पोलीस आणि खंडणी दरोडा विरोधी पथकाची संयुक्त कारवाई

0
540

हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) – प्रवासी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई हिंजवडी पोलिस आणि खंडणी दरोडा विरोधी पथकाने संयुक्तरित्या केली. आरोपींकडून तब्बल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हिंजवडी, वाकड आणि वारजे पोलीस ठाण्यातील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

नसीर मंजूर शेख (वय २५), सोमेश्वर तुकाराम म्हस्के (वय २२, दोघे रा. जुनी पेठ, ता. गेवराई, जि. बीड), मनोज एकनाथ गायकवाड (वय २४, रा. माटेगावरोड, उमापूर, ता. गेवराई, जि. बीड) आणि रघुनाथ गोविंद कळकेकर (वय २५, रा. धर्मापुरी, ता. कंदार, जि. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या चौघा आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथे रविवार (दि.१० फेब्रुवारी) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मुकेश मोहिंदर कपूर (वय ४६) हे हिंजवडीमधून एका प्रवासी कारमधून मुंबई जाण्यासाठी निघाले होते. कार वाकड ब्रिजपासून मुंबईच्या दिशेने काही अंतर गेली असता दोन आरोपी कारमध्ये बसले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून मुकेश यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि एटीएम कार्ड हा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. तसेच मुकेश यांना अज्ञात स्थळी सोडून पळून गेले. याप्रकरणी मुकेश यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

यावर हिंजवडी पोलिस आणि खंडणी दरोडा विरोधी पथकाने संयुक्तरित्या चौघा आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून एकूण १ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील तीन, वाकड आणि वारजे पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, अशोक दुधवणे, राजेंद्र शिंदे, किरण काटकर, उमेश पुलगम, प्रवीण माने, सुधीर डोळस, प्रदीप गोडांबे, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने केली.