Chinchwad

हिंजवडीत पीएमपीएलच्या धावत्या बसला आग

By PCB Author

August 26, 2019

हिंजवडी, दि. २६ (पीसीबी) – पीएमपीएलच्या धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना आज (सोमवार) सकाळी आठच्या सुमारास हिंजवडीतील इन्फोसिस कंपणीच्या सर्कल जवळ घडली.

सुदैवाने या घटनेत प्रवाशांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आज सकाळी आठच्या सुमारास हिंजवडी ते मनपा या मार्गावरील (एमएच/१४/सीडब्यू३५४१) या क्रमांकाची बस हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क मधील इन्फोसिस कंपणीच्या सर्कल जवळील रस्त्याने फेज तीनच्या दिशेने जात होती. या दरम्यान, बसने अचानक पेट घेतला. इंजिनमधून मोठ्याप्रमाणात धूर बाहेर येऊ लागल्याने चालकाने तातडीने सर्व प्रवाशांना खाली उतरविले. घटनेची माहिती तातडीने हिंजवडी एमआयडीसी अग्निशामक दलाला देण्यात आली. आणि काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.