हिंजवडीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या रेकॉर्ड वरील सराईत तिघांना अटक; रावण टोळीतील सदस्य मात्र सटकला

0
2975

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – दरोड्याच्या तयारीत असलेल्या रेकॉर्ड वरील सराईत तिघांना १ पिस्टल, १ काडतूस, चार कोयते, मिरचीची पुड आणि दोन दुचाक्या असा एकूण १ लाख १० हजार ३०० रुपयांच्या ऐवजासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई हिंजवडी पोलिसांनी आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास सुसगाव रोडवरील कोहीनुर सोसायटीच्या समोर असलेल्या मोकळ्या मैदानात केली.

रोहीत लक्ष्मण गायकवाड (वय २३, रा. पडवळनगर, थेरगाव), अक्षय राजेंद्र फुगे (वय २०, रा. शिवराजनगर, जगताप डेअरी) आणि आशिष कैलास कांबळे (वय २०, रा. पडवळनगर, थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या तिघा सराईत आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस पथक गस्तीवर असताना एका खबऱ्याकडून पोलीस नाईक विवेक गायकवाड यांना माहिती मिळाली कि, सुसगाव रोडवरील कोहीनुर सोसायटीच्या समोर असलेल्या मोकळ्या मैदानात काही इसम संशयीतरित्या उभे आहेत. पोलिसांनी त्यानुसार त्या ठिकाणी धाव घेतली असता आरोपी तेथून पळू लागले. पोलीसांनी त्यांचा पाठलाग केला आणि सराईत आरोपी रोहीत, अक्षय आणि आशिष या तिघांना अटक केली. तर त्यांचे इतर सहा साथीदार फरार झाले. पोलीसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे १ पिस्टल, १ काडतूस, चार कोयते, मिरचीची पुड आणि दोन दुचाक्या असा एकूण १ लाख १० हजार ३०० रुपयांच्या ऐवज आढळून आला. पोलीसांनी तो जप्त करुन आरोपींची कसून चौकशी केली असता ते बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएमवर दरोडा टाकणार होते अशी सांगितले. तसेच त्यांचे इतर फरार साथीदारांची नावे अक्षय साबळे, किसन कांबळे, ओंकार फडतरे, बंदर उर्फ दिपक सावंत, मंन्त्या आणि हम्या चंदनशिवे असल्याचे सांगितले. पोलीसांनी ती नावे रेकॉर्डमध्ये तपासली असात हे सर्व रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असल्याचे आढळून आले असून आरोपी अक्षय साबळे हा कुविख्यात रावण टोळीचा सक्रिय सदस्य असल्याचे समोर आले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी गवारे, पोलीस उपनिरीक्षक अशोक गवारी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश धामणे, हवालदार किरण पवार, बाळकृष्ण शिंदे, पोलीस नाईक विवेक गायकवाड, आतिक शेख, कृणाल शिंदे, पोलीस शिपाई विकी कदम, सुभाष गुरव, गुमलाड, राणे यांच्या पथकाने केली.