हिंजवडीतून खंडणीसाठी अपहरण झालेल्या तरुणाची पोलिसांनी केली सुखरुप सुटका

462

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – वीस लाखांच्या खंडणीसाठी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या एका तरुणाचे अज्ञातांनी अपहरण केले. या प्रकरणाचा जलद गतीने छडा लावत हिंजवडी पोलिसांसह खंडणी दरोडा विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त रित्या कारवाई करुन तरुणाची सुखरुप सुटका केली.

वरद शैलेश चिने (वय २१, रा. बावधन) असे सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शैलेश चिने (वय ५१) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरद अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तो नोकरी देखील करतो. बुधवारी रात्री साडेअकरा वाजता वारजे माळवाडी येथून अज्ञातांनी त्याचे अपहरण केले. बराच वेळ झाला तरी वरद घरी आला नसल्याने त्याचे पालक काळजी करीत होते. दरम्यान, मध्यरात्री सव्वाएक वाजता वरदच्या वडिलांना वरदच्या मोबाईल वरून अपहरणकर्त्यांनी फोन केला. फोनवर त्यांनी २० लाख रुपये देण्याची मागणी केली. पैसे दिले नाही तर मुलाला मारण्याची धमकी आरोपींनी फोनवर दिली. तसेच पैसे कुठे द्यायचे याबाबत गुरुवारी सकाळी अकरा वाजता फोन करून सांगतो, असे सांगितले. घाबरलेल्या शैलेश यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. यावर हिंजवडी पोलिसांसह खंडणी दरोडा विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने तपास चक्र फिरुन वरदचा शोध घेतला. आरोपींना पोलिसांना या बाबतची माहिती कळाल्याचे कळताच आरोपींनी वरदला भुशी धरणाजवळ उघड्या परिसरात सोडून पळ काढला. अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागले नसून पोलीस यंत्रणा आरोपींच्या मागावर आहेत.