Chinchwad

हिंजवडीतील मारुंजी येथे दुकानदारावर कोयत्याने वार; तिघांविरोधात गुन्हा

By PCB Author

February 17, 2019

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – दुकान बंद करुन घरी निघालेल्या एका दुचानदाराला आढवून तिघा टोळक्यांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन कोयत्याने वार केला तसेच जिवेमारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवार (दि.१५) रात्री अकराच्या सुमारास मारुंजी येथील कॅनेलजवळ घडली.

मयुर अर्जुन बेडकुते (वय १९, रा. पाटीलवस्ती नेरे दत्तवाडी, मुळशी) असे जखमी दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, राज भरत लोखंडे आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर याचे मारुंजी येथे दुकान आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास तो दुकान बंद करुन दुचाकीवरुन घरी निघाला होता. यावेळी आरोपी राज लोखंडे आणि त्याच्या दोन मित्रांनी त्यांची गाडी मयुर याच्या दुचाकीच्या आडवी लावली. तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन डोक्यात कोयत्याने वार केला आणि जिवे मारण्याची धमकी देऊन फरार झाले. याप्रकरणी राज आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.