हिंजवडीतील ‘त्या’ पीडित मुलींच्या कुटूंबियांना खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी दिला धीर

0
715

हिंजवडी, दि. २४ (पीसीबी) – कासारसाई लैंगिक अत्याचार प्रकरणातील ऊसतोड कामगारांच्या मुलीच्या  कुटूंबियांची भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सोमवारी (दि. २४) भेट घेऊन धीर दिला. पीडितेच्या कुटूंबियांना शासकीय सहाय्य मिळवून देण्याबरोबरच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार मुंडे यांनी सांगितले.

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचनेनुसार खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी कासारसाई लैंगिक अत्याचार प्रकरणातील ऊसतोड कामगारांच्या मुलीच्या आई-वडिलांची भेट घेत त्यांना धीर दिला. झालेली घटना मन सुन्न करणारी आणि संतापजनक आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी या घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आपण आग्रह धरू, असे आश्वासन खासदार मुंडे यांनी दिला.

या घटनेत लैंगिक अत्याचारानंतर मृत्यूमुखी पडलेल्या मुलींच्या कुटूंबियांची देखील खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी भेट घेवून सांत्वन केले. पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्याकडूनही त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत चर्चा केली. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली. या घटनेबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, केशव घोळवे, नगरसेविका योगिता नागरगोजे, प्रियंका बारसे, रवि खेडकर, दिपक नागरगोजे, अशोक मुंडे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शैला मोळक, आबा नागरगोजे, संतोष राख आदी उपस्थित होते.