हिंजवडीतील आयटीपार्क कंपनीच्या गाड्यांची वाहतूक भुमकर चौक मार्गे वळवा

0
737

नेरे, दि. २० (पीसीबी) – हिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौकातील आयची पार्क कंपनीच्या गाड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आयटीपार्क कंपनीच्या गाड्यांची वाहतूक बंद करून ती वाहतूक भुमकर चौकातून लक्ष्मी चौकमार्गाने वळविण्यात यावी, अशी मागणी वंदे मातरम् शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जनार्दन पायगुडे यांनी हिंजवडी वाहतूक विभागाकडे केली आहे.

हिंजवडी चौक ते मारुंजी, दत्तवाडी, कासारसाई आणि चांदखेडपर्यंत ग्रामीण भागापर्यंत अॅटोरिक्षा वाहतूक बेसुमार प्रवाशी वाहतूक करतात. त्याचप्रमाणे चिंचवडगावाकडे जाणाऱ्या बसेससाठी प्रवाशी छत्रपती चौकातील गणपती मंदीरासमोर बसची वाट पाहत थांबतात. मात्र बेसुमार होणाऱ्या अॅटोरिक्षाची वाहतूक आणि आयटी पार्क कंपनीच्या वाहनांनी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला समोरे जावे लागते.

त्यामुळे, हिंजवडीतील छत्रपती शिवाजी चौकापासून आयटी पार्क फेज १, फेज २ आणि फेज ३ पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी आणि हिंजवडी गावठाणमध्ये आयटीपार्क कंपनीच्या गाड्यांची होणारी वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर आयटी पार्क कंपनीच्या गाड्या भुमकर चौकातून लक्ष्मी चौकाकडून वळविण्यात याव्यात, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.