हिंगोलीत एका दिवसात ‘कोरोना’चे तब्बल 26 नवे रुग्ण,25 जण हे राज्य राखीव पोलिस दलाचे जवान

0
418

हिंगोली, दि. १ (पीसीबी) : हिंगोलीतील ‘कोरोना’चं सावट गडद करणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंगोलीत एका दिवसात ‘कोरोना’चे तब्बल 26 नवे रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे यापैकी 25 जण हे राज्य राखीव पोलिस दलाचे जवान आहेत. अवघ्या दहा दिवसांपूर्वी हिंगोली जिल्हा ‘कोरोना’मुक्त झाल्याची घोषणा झाली होती, मात्र इतक्या कमी दिवसात रुग्णसंख्या फोफावून पन्नाशीच्या उंबरठ्यावर आल्याने धाकधूक वाढली आहे.

हिंगोलीतील कोरोनाबधितांची संख्या गेल्या 24 तासात 21 वरुन थेट 47 वर गेली आहे. यापैकी एका रुग्णाला डिस्चार्ज मिळाला असून 46 जणांवर उपचार सुरु आहेत. हिंगोलीवासियांचं कोरोनामुक्त झाल्याचं स्वप्न आधी एकदा विरलं होतं, आता रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने उलट चिंता वाढत आहे. कालच्या दिवसात (30 एप्रिल) नव्याने सापडलेल्या 26 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 25 जण एसआरपीएफचे जवान आहेत. तर नांदेडहून पंजाबला गेलेल्या हिंगोलीच्या व्यक्तीलाही लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

याआधी, हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा रिपोर्ट 16 एप्रिलला निगेटिव्ह आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 21 एप्रिलला दुपारी चार वाजता हिंगोली जिल्हा ‘कोरोना’मुक्त झाल्याची घोषणा केली होती, मात्र त्याच दिवसात, अवघ्या साडेचार तासांमध्ये सहा नवे रुग्ण आढळल्याने हिंगोली जिल्ह्याची ‘कोरोना’मुक्ती औटघटकेची ठरली होती. त्यावेळी एसआरपीएफच्या सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.  मालेगाव आणि मुंबईतून हिंगोलीत आलेल्या 194 जवानांना क्वारंटाइन करुन ठेवण्यात आलं होतं. त्यापैकी 95 जवानांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते, तर सहा जवानांना कोरोनाची लागण झाली होती. आता पुन्हा एसआरपीएफच्या जवानांना लागण झाल्याने भीती वाढली आहे.