Maharashtra

हा तर शिवराय आणि तानाजी मालुसरेंचा अपमान – सुप्रिया सुळे

By PCB Author

January 21, 2020

मुंबई,दि.२१(पीसीबी) – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केलेल्या प्रचार व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराज तर गृहमंत्री अमित शहा यांना नरवीर तानाजी मालुसरे यांच्या रुपात दाखविले आहे. हा छत्रपती शिवराय आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या तानाजी मालुसरे यांचा अपमान आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी तर गृहमंत्री अमित शहा यांची तुलना तानाजी मालुसरे यांच्याशी करण्यात आलेल्या एका व्हिडीओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी ट्विट करत भाजपवर घणाघात केला आहे.

पुस्तक प्रकाशनानंतर दिल्ली भाजपने ही दुसरी अक्षम्य कागाळी केली आहे. हे जाणीवपूर्वक केलं जातंय. छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारी जनता हे खपवून घेणार नाही. भाजपला या कृतीबद्दल महाराष्ट्राची आणि शिवप्रेमी जनतेची माफी मागावीच लागेल, असंही त्या म्हणाल्या आहेत.