Desh

हार्दिक पांड्यासारखा प्रतिभावन खेळाडू भारतीय संघात नाही – विरेंद्र सेहवाग

By PCB Author

May 15, 2019

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने कौतुक केले आहे. हार्दिक पांड्याच्या तोडीचा एकही प्रतिभावान खेळाडू भारतीय संघात नसल्याचे सेहवागने म्हटले आहे. आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून देण्यात हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

“फलंदाजी आणि गोलंदाजीचा विचार केला, तर हार्दिक पांड्यासारखा प्रतिभावान खेळाडू भारतीय संघात नाहीये. जर त्याच्या जवळ जाणारा एकही खेळाडू असता तर हार्दिकची विश्वचषक संघात निवड झाली नसती.” सेहवागने हार्दिकची स्तुती करताना विजय शंकरच्या निवडीवरून निवड समितीला टोला लगावला. तो cricbuzz.co या संकेतस्थळी बोलत होता.

विश्वचषकासाठीच्या १५ सदस्यीय भारतीय संघात हार्दिकची निवड झाली आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना हार्दिक पांड्याने १५ डावांमध्ये ४०२ धावा केल्या. ९१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्यामुळे विश्वचषकात हार्दिक पांड्या कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.