Desh

हाफिज सईद, मसूद अजहर, दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित  

By PCB Author

September 04, 2019

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) –  ‘बेकायदा कारवाया प्रतिबंध’ (यूएपीए) कायद्यांतर्गत भारताने चार दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अजहर याचा या यादीत पहिला  तर  ‘जमात उद-दावा’चा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याचा दुसरा नंबर आहे. तिसऱ्या नंबरवर गँगस्टर माफिया डॉन दाऊद इब्राहीम  आहे.  

तसेच दहशतवादी जकी-उर लख्वीचाही या यादीत समावेश आहे. यूएपीए म्हणजेच बेकायदा कारवाया प्रतिबंध कायदा नुकताच संसदेच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता. विशेष म्हणजे, मसूद अजहर आणि हाफिज सईद या दोघांना संयुक्त राष्ट्राने ग्लोबल दहशतवादी म्हणून याआधीच जाहीर केलेले आहे. जर एखादी व्यक्ती दहशतवादी कारवाया करत असेल किंवा त्यात सहभागी असल्यास त्या व्यक्तीला दहशतवादी ठरवता येऊ शकते, असे यूएपीए कायद्यात तरदूत आहे.

यूपीए सरकारने २००४ मध्ये हे विधेयक आणले होते. २००८  साली या विधेयकात सुधारणा करण्यात आली. त्यानंतर २०१३ साली या विधेयकात पुन्हा सुधारणा करण्यात आली. जर एखादी व्यक्ती दहशतवाद पसरवण्यासाठी मदत करीत असेल, पैसे पुरवत असेल, दहशतवादी साहित्याचा प्रचार-प्रसार करीत असेल तर त्या व्यक्तीला या कायद्यानुसार दहशतवादी म्हणून घोषित करता येवू शकते.