हाथसर सामूहिक बलात्कार प्रकरणातील दलित युवतीचा मृत्यू,देशभर संतापाची लाट

0
369

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये कथित सामूहिक बलात्कार झालेल्या 20 वर्षीय दलित युवतीचा सोमवारी दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेच्या विरोधात आता देशभरात संतापाची लाट आली असून राजकीय पक्ष, विविध संघटना पुढे आल्या आहेत. १४ सप्टेंबरची घटना २९ सप्टेंबर पर्यंत दाबून ठेवली, असाही आरोप सुरू असून २०१२ मध्ये निर्भया प्रकरणात ज्या पध्दतीने माध्यमांनी उठाव केला होता ती माध्यमे गेली कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. दलित संघटनांनीही आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

पीडित युवतीच्या भावानं एका चॅनल प्रतिनिधीशी बोलताना तिच्या मृत्यूची बातमी सांगितली. हाथरस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील चारही आरोपींना अटक करून कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

या मुलीला सोमवारी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेजच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. त्याआधी ती दोन आठवडे मृत्यूशी झुंज देत होती.

14 सप्टेंबरला आई आणि भावासोबत गवत कापण्यासाठी गेली असताना या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पीडितेच्या भावानं म्हटलं आहे की, “माझी बहीण आई आणि मोठा भाऊ गवत कापण्यासाठी गेले होते. भाऊ गवताचा एक भारा घेऊन घरी आला होता. आई गवत कापत होती आणि ती मागे होती. तिथेच तिला खेचून सामूहिक बलात्कार करण्यात आला. माझ्या आईला ती बेशुद्धावस्थेत सापडली.”

कुटुंबीयांनी तिला बेशुद्धावस्थेत असतानाच आधी स्थानिक आरोग्य केंद्रात नेलं आणि तिथून पुढे अलिगढ मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आलं.

मेडिकल कॉलेजमध्ये ती 13 दिवस व्हेंटिलेटरवर होती. सोमवारी तिला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं, जिथे तीनच्या सुमारास तिनं प्राण सोडले. पीडितेच्या भावानं सांगितलं, “तिची जीभ कापण्यात आली होती. मणक्याचं हाड तुटलं होतं, शरीराचा एकही अवयव काम करत नव्हता. ती बोलू शकत नव्हती, कुठला इशाराही करू शकत नव्हती.”

गावातल्याच उच्च जातीतल्या चार जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.हाथरसचे एसपी विक्रांत वीर यांनी माहिती दिली की, “चारही आरोपींना अटक करून तुरुगांत रवानगी करण्यात आली आहे. आम्ही कोर्टाकडे फास्ट ट्रॅक सुनावणीची मागणी करू. पीडितेच्या कुटुंबीयांनाही गावात सुरक्षा देण्यात आली आहे.”

बहुजन समाज पार्टीच्या नेता मायावती यांनीही या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. मायावतींनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘यूपीच्या हाथरस जिल्ह्यात एका दलित मुलीला आधी वाईट पद्धतीनं मारण्यात आलं. मग तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. ही अतिशय लाजिरवाणी आणि अति-निंदनीय गोष्ट आहे. अन्य समाजाच्या मुली-बहिणीही आता उत्तर प्रदेशात सुरक्षित नाहीत. सरकारनं याकडे लक्ष द्यावं अशी बीएसपीची मागणी आहे.”

पीडितेच्या मृत्यूनंतर मायावती यांनी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि आरोपींना फाशी दिली जावी अशी मागणी केली आहे. हाथरसच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनीही ट्वीट करून मदतीचं आश्वासन दिलं आहे. “चंदपा पोलीस स्टेशनवाल्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांना 4,12,500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली होती. आज 5,87,500 रुपयांची अतिरिक्त मदत दिली जात असून एकूण 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.”