हाच तो क्रूरकर्मा, शिक्षण सोडून ‘जैश’मध्ये सामील झाला

0
767

श्रीनगर, दि. १५ (पीसीबी) – आदिल अहमद दार… वय २० वर्ष… गेल्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत आदिल हा पुलवामा जिल्ह्यातील गावात एका वखारीत काम करत होता… आदिलने १२ वीचे शिक्षण अर्धवट सोडले…बुरहान वानीच्या मृत्यूनंतर झालेल्या हिंसाचारातही तो सामील होता.. गेल्या वर्षी मार्चमध्ये आदिल कुटुंबीयांना काहीच न सांगता घरातून निघून गेला…वर्षभरानंतर याच आदिलने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हल्ला केला आणि ३९ जवानांचे प्राण घेतले.

३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए महम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्यात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले असून २० जखमी झाले. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. आदिल दार असे आत्मघातकी हल्ला चढविणाऱ्या अतिरेक्याचे नाव असून तो मार्च २०१८ मध्ये जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०१८ रोजी आदिल घरातून निघून गेला आणि त्यानंतर तो कधीही भेटला नाही. समीर अहमद हा आदिलचा मित्र असून तो देखील याच दिवशी घरातून निघून गेला होता. आदिल बेपत्ता असल्याची तक्रारही कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली. मात्र, काही दिवसांनी सोशल मीडियावर आदिलचे फोटो व्हायरल झाले होते. यात आदिलच्या हातात बंदुक होती आणि तो जैश- ए- मोहम्मदचा दहशतवादी असल्याचे म्हटले होते.

आदिलचे वडील गुलाम हसन दार यांचे छोटे दुकान आहे. आदिलने १२ वीचे शिक्षण अर्धवट सोडले होते. शिक्षण सोडल्यानंतर तो घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या वखारीत काम करत होता. ‘आदिल घरातून निघून गेल्यावर आम्हाला एकदाच भेटला होता. त्याचा चुलत भाऊ हा देखील दहशतवादी होता. आदिल ‘जैश’मध्ये सामील होण्याच्या ११ दिवस अगोदरच त्याचा चकमकीत मृत्यू झाला होता’, असे दार यांनी सांगितले.

बुरहान वानीच्या मृत्यूनंतर २०१६ साली जम्मू- काश्मीरमध्ये झालेल्या आंदोलनात आदिल सहभागी झाला होता. आंदोलनादरम्यान सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात आदिलच्या पायाला गोळी लागली होती, असे कुटुंबीयांनी सांगितले.

दोन्ही बाजूंची लोक मारली जातात हे पाहून वाईट वाटते. राजकारणी हे फक्त राजकारण करत असून ते मूळ समस्येवर तोडगा काढत नाही. जम्मू- काश्मीरमधील तरुण हातात बंदूक का घेत आहेत, याचा राजकरण्यांनी विचार केला पाहिजे, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. आदिलला या हल्ल्यापूर्वी सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले होते, असे माहिती सूत्रांनी दिली.