हाँगकाँग येथील सर्जन चॅरिटी ट्रस्टचा पुण्यातील गरीब मुलांना शिक्षणासाठी आधार

0
385

दिल्ली, दि, २१ (पीसीबी) – ग्रामीण भागातील मुलांना चांगली वाचनीय पुस्तके उपलब्ध व्हावीत या उद्देशाने हाँगकाँग येथील सर्जन चॅरिटी ट्रस्ट च्या सहाय्याने ‘वाय फॉर डी’ फाउंडेशनच्या ‘बुक फॉर पर्पज’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण देशभरातील २५० शाळांमध्ये वाचनालये सुरू करण्यात येत आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात नुकतेच या उपक्रमाचे उद्घाटन झाले. पुणे जिल्ह्यातील दोन शाळांमध्येही या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आणि जून अखेरीस उर्वरित ४८ शाळात उपक्रमाची सुरवात होईल.

हाँगकाँग येथील सर्जन चॅरिटी ट्रस्टच्या साह्याने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील शेरे येथील मामासाहेब मोहोळ विद्यालय आणि कोळवणमधील न्यू इंग्लिश स्कूल या दोन शाळांमधून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना प्रफुल्लकुमार निकम म्हणाले, ‘वाय फॉर डी’ ही ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणारी सामाजिक संस्था असून, हाँगकाँग येथील सर्जन चॅरिटी ट्रस्टच्या साह्याने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात नुकतीच या उपक्रमाला सुरुवात झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रधान सचिव अजोय मेहता यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे. अनेक कुटुंबांची हलाखीची आर्थिक परिस्थिती, तसेच शिक्षणाच्या प्राथमिक सोयीसुविधांचा अभाव यांमुळे आजही ग्रामीण भागातील मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या माध्यमातून जगाच्या खिडक्या खुल्या करून देण्याचा आमचा उद्देश आहे.

या उपक्रमाद्वारे पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. यामध्ये शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांबरोबरच आत्मचरित्रे, माहितीपर पुस्तके, विज्ञान, इतिहास, गोष्टी यांसारख्या पुस्तकांचा समावेश आहे.