उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका त्यांना भोवण्याची शक्यता आहे.

Maharashtra

हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

By PCB Author

October 18, 2019

कन्नड, दि.१८ (पीसीबी) – कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल  हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची नोंद घेत त्यांच्यावर कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह विधान भोवण्याची चिन्ह आहेत.पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि आता शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संस्थापक हर्षवर्धन जाधव यांचीही जीभ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना घसरली होती. एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी अश्लाघ्य भाषेत टीका केली होती, त्यांनंतर त्यांच्या त्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेही भाजपाकडे असणारा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ स्वतःकडे घेत सत्तारांना उमेदवारी दिली. सत्तार यांच्या उमेदवारीवरून हर्षवर्धन जाधव यांनी टीका केली होती.

एका प्रचार सभेत बोलत असताना हर्षवर्धन जाधव म्हणाले, “हा हरामखोर हर्षा, याच्यामुळे मुसलमान निवडून आला लोकसभेला. हे शिवसेनेचे भाषण आहे. दुसरे काही भाषण नाही त्यांच्याकडे. आमचा उमेदवार असे करतो, तसे करतो हे नाही. आमच्या खासदाराने पंचवीस वर्षात काय केले हे नाही. आमच्या उमेदवाराला किती अक्कल आहे, तो ट्रफिक पोलिसला फोन करू शकतो की नाही, हे नाही. तर काय? हर्षामुळे मुसलमान आला ना निवडून. आहो तुम्ही येडे झाले का, त्याला कुठं मतदान करू ऱ्हायले. हे शिवसेनेच भाषण राहणार आहे उद्या. केलंच तसं भाषण त्यांनी परवा, उद्धव ठाकरेंनी. हिरवा वरती चढवला, भगवा खाली आला. मी त्यांना एक प्रश्न विचारतो, विधानसभेतही विचारतो आणि तुमच्या समक्षही शिवसैनिकांना विचारतो. एव्हढेच तुम्हाला मुसलमानांच्याबद्दल वावडे आहे, तर सत्तार तुमचा कोण लागतो? कोण लागतो सत्तार तुमचा? पाहुणा आहे, चुलता आहे? हमारे अब्दुल भाई अभी अभी शिवसेना में आये है…,” अशी पातळी सोडत हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.