हर्षवर्धन जाधव ग्रामपंचायतीच्या राजकारणातून बाद? संजना जाधवांची एन्ट्री!

0
400

औरंगाबाद, दि. २७ (पीसीबी) : पुण्यातील मारहाण प्रकरणावरुन पुन्हा एकदा चर्चेत आलेले कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव ग्रामपंचायतीच्या राजकारणातून बाद होण्याची शक्यता आहे. तर हर्षवर्धन जाधव ऐवजी त्यांच्या पत्नी आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी ग्रामपंतायतींसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. कन्नड तालुक्यातील अनेक गावांमध्ये संजना जाधव यांनी पॅनल उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. 

हर्षवर्धन जाधव हे कायम वादात असलेलं व्यक्तीमत्व आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपण राजकारणातून संन्यास घेत आहोत, असं सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी आपली पत्नी पुढील राजकारण पाहिल, असंही म्हटलं होतं. दरम्यान, पुण्यातील मारहाण प्रकरणात हर्षवर्धन जाधव पुन्हा चर्चेत आले आहेत. अशावेळी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जाधव कुठेच दिसत नाहीत. त्याऐवजी त्यांच्या पत्नी संजना जाधव यांनी कन्नड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पॅनल उभारण्याची तयारी सुरु केली आहे. महत्वाची बाबम म्हणजे जाधव पती-पत्नी यांच्यात काडीमोड होणार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारणात एन्ट्री!
संजना जाधव यांनी पिशोर गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आपला पॅनल उभा केला आहे. पिशोर गाव हे संजना आणि हर्षवर्धन जाधव यांचं मूळ गाव आहे. पिशोर गावासह संजना जाधव या कन्नड तालुक्यातील अनेक गावांमध्येही पॅनल उतरवणार असल्याचं कळतंय. त्यामुळे हर्षवर्धन जाधव हे ग्रामपंचायत निवडणुकीतून बाद झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर संजना जाधव यांची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारणात एन्ट्री होताना दिसत आहे.