हरयाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी भाजपमध्ये

0
528

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – हरयाणवी डान्सर आणि सिंगर सपना चौधरीने अखेर राजकारणात एन्ट्री केली आहे. तिनं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजप नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात तिने भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भाजपची सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे. याच ठिकाणी सपना चौधरीनं भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप नेते शिवराज सिंह चौहान, मनोज तिवारी, हर्षवर्धन सिंह आदींसह अन्य दिग्गज नेते उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सपना चौधरी राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. सुरुवातीला ती काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. तिने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची छायाचित्रेही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, आपण हे वृत्त चुकीचे आहे, असे तिने माध्यमांसमोर स्पष्ट केले होते.

लोकसभा निवडणूक प्रचारकाळात सपना भाजपचे दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासोबत दिसली. दिल्लीतील विविध मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांसाठी काढलेल्या रोड शोमध्ये ती सहभागी झाली होती. अखेर आज तिने अधिकृतपणे राजकारण एन्ट्री केली असून, तिने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.