हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी दाखवलेली जिगर महत्वाची ठरली

0
552

सिडनी, दि.११ (पीसीबी) – निकालाची चिंता न करता अखेरपर्यंत लढायचे हेच एकमेव नियोजन आम्ही केले होते, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने व्यक्त केली. विजयासाी ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने तब्बल १३२ षटके खेळून काढत सामना अनिर्णित राखला.

भारतीय संघ सहकाऱ्यांच्या या कामगिरीने कर्णधार रहाणे निश्चितच सुखावला होता. हनुमा विहारीने साडे तीन तास, तर अश्विनने अखेरचे दोन तास खेळपट्टीवर टिच्चून उभे राहताना ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना निराश केले. त्यापूर्वी रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांच्यातील १४८ धावांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियावर दडपण येण्यास सुरवात झाली होती.

चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांची भागिजारी चांगलीच झाली. पण, त्याही पेक्षा हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी दाखवलेली जिगर महत्वाची ठरली. साडे तीन तास नुसते उभे राहणे काही सोपे नाही.
– अजिंक्य रहाणे, भारताचा कर्णधार

या एकूणच कामगिरीविषयी बोलताना रहाणे म्हणाला,’आपली गुणवत्ता, जिगर दाखवा आणि अखेरपर्यंत लढा इतकेच सर्व सहकाऱ्यांना सकाळी बजावले होते. निकाल काय लागेल याची चिंता करायची नाही. आपला खेळ करा. सहकाऱ्यांनी आपल्या हाकेला भरभरून दाद दिली. एक अशक्यप्राय सामना त्यांना अनिर्णित राखला मला खूप अभिमान वाटतो. ‘

रहाणे याने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला २ बाद २०० धावसंख्येवरून ३३८ धावांत रोखणे ही देखिल मोठी कामगिरी होती, असे सांगितले. तो म्हणाला,’भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात चांगलीच कामगिरी केली. पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारण्यापासून त्यांनी ऑस्ट्रेलियाला रोखले हे देखिल महत्वाचे आहे.’

पंतला जाणुनबुजून बढती दिल्याचे रहाणेने या वेळी सांगितले. तो म्हणाला,’उजव्या आणि डाव्या हाताचे फलंदाज पाठवून गोलंदाजांना गोंधळात टाकण्यासाठीच पंतला बढती दिली आणि त्याने देखील त्याचा फायदा उठवला. ‘

टिम पेन म्हणाला…

आम्ही विजयासाठी अनेक संधी निर्माण केल्या. गोलंदाजांनी विशेषतः नॅथन लायन याने सुरेख गोलंदाजी केली. पण, माझ्याकडूनच काही झेल सुटले त्याची किंमत मोजावी लागली.
गेल्या दोन सामन्यात आम्ही फार चांगली कामगिरी केलेली नाही. पण, या कसोटीत किमान आमच्या फलंदाजांना लय गवसली हे चांगले झाले.
विल पुकोवस्की आणि कॅमेरून ग्रीन दोघेही गुणी खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलिया त्यांच्याकडे भविष्यातील गुंतवणूक म्हणून पाहत आहे. त्यांच्यापुढे मोठी कारकिर्द आहे.
सिडनीची खेळपट्टी प्रथमच वेगळी भासली. चौथ्या दिवशी ती बदलते पण, इतकी ही कल्पनाच करवत नाही. अखेरच्या दिवशी खेळपट्टीवर गोलंदाजांना कसलीच साथ मिळाली नाही.