Desh

हनिमूनसाठी भारतात आलेल्या जोडप्याने नीलगिरी माऊंटनची चक्क संपूर्ण ट्रेनच केली बुक  

By PCB Author

September 01, 2018

चेन्नई, दि. १ (पीसीबी) – लग्नानंतर हनिमूनचे क्षण प्रत्येक जोडप्यासाठी खास असतात. आयुष्यभराच्या त्या गोड आठवणी असतात. त्यामुळे प्रत्येक जोडपे आपल्या हनिमूनला खास बनवण्यासाठी काही ना काही हटके प्लानिग करतात. जो़डीदाराला सरप्राईज देण्याचा दोघांचा प्रयत्न असतो. नुकतेच ब्रिटनमध्ये विवाहबद्ध होऊन भारतात हनिमूनसाठी आलेल्या एका जोडप्याने नीलगिरी माऊंटन रेल्वेची संपूर्ण ट्रेन बुक केली होती.

नीलगिरी हे तामिळनाडूतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या ग्राहॅम विलियम आणि सिल्विया प्लासिस या जोडप्याने निलगिरीच्या सुंदर पर्वतरांगांचा आनंद घेताना एकांत मिळावा यासाठी ही तीन डब्ब्यांची संपूर्ण ट्रेन बुक केली होती. दक्षिण रेल्वेच्या सालेम विभागाने नीलगिरी माऊंटन रेल्वेची विशेष चार्टर्ड सेवा पुन्हा सुरु केली असून ग्राहॅम आणि सिल्विया पहिले प्रवासी ठरले आहेत.

त्यांनी रेल्वेच्या आयआरसीटीसी मार्फत ही संपूर्ण ट्रेन बुक केली होती. मेट्टपालयम ते ऊटी या ४८ किलोमीटरच्या एकमार्गी प्रवासासाठी या जोडप्याने २.५० लाख रुपये मोजले. १४३ प्रवासी क्षमता असलेल्या या ट्रेनमध्ये चालक सोडल्यास ग्राहॅम आणि सिल्विया दोघेचजण होते. साडेपाच तासांच्या प्रवासात ही ट्रेन एकूण १३ बोगदे आणि जंगलामधून जाते.