Pune

हडपसरमध्ये टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड; स्थानिकांनी आठ आरोपींना दिले पोलिसांच्या ताब्यात

By PCB Author

October 28, 2018

पुणे, दि. २८ (पीसीबी) – हडपसर ससाणेनगर येथील गल्ली नंबर १० मध्ये शनिवारी (दि.२७) रात्रीच्या सुमारास आठ ते नऊ जणांच्या टोळकयाने तलवारी आणि कोयते परिसरातील १० ते १२ वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिकांनी आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

ओंकार गिरमे, निखिल तिकोटे, श्रीकांत जाधव, औदुंबर बिराजदार, महेश गायकवाड असे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर इतर तीन अनोळखी इसमांना देखील स्थानिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री हडपसर ससाणेनगर येथील गल्ली नंबर १० मध्ये घरा बाहेर उभ्या केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आठ ते नऊ जणांच्या टोळक्यांनी तोडफोड केली. या घटनेमध्ये दुचाकी आणि चारचाकी गाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र स्थानिकांनी मोठ्या हिमतीने या आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यामध्ये एकूण आठ जणांचा समावेश आहे. तर सत्तुर्या उर्फ राजेश नेवसे हा आरोपी पसार झाला आहे. हडपसर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.