Banner News

हजार दिवसांत सर्व गावे ऑप्टिकल फायबरने जोडणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

By PCB Author

August 15, 2020

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. आपल्या 86 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारतासह, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. या भाषणात त्यांनी काही मोठ्या घोषणाही केल्या. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन, 1000 दिवसात प्रत्येक गाव ऑप्टिकल फायबरशी जोडणार, प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष अभियान आदी महत्वाच्या घोषणा त्यांनी यावेळी केल्या.

नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन सुरु होणार आहे. प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी दिली जाणार आहे. या आयडीमध्ये आपली प्रत्येक टेस्ट, प्रत्येक आजार, कोणत्या डॉक्टरने कोणती औषधं दिली, केव्हा दिली, रिपोर्ट्स, अशी सर्व माहिती या हेल्थ कार्डमध्ये असणार आहे.

1000 दिवसात प्रत्येक गाव ऑप्टिकल फायबरशी जोडणार पंतप्रधान म्हणाले, वर्ष 2014 च्या आधी देशात केवळ 60 पंचायती ऑप्टिकल फायबरशी जोडलेल्या होत्या. मागील पाच वर्षात देशात जवळपास दीड लाख ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरशी जोडल्या गेल्या. येत्या 1000 दिवसात देशातील प्रत्येक गाव ऑप्टिकल फायबरशी जोडल जाईल.

कोरोनावर लस कोरोनावरील लसीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले, कोरोना वरची लस कधी होणार? हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. भारतात एक दोन नव्हे तर तीन-तीन लसी प्रगतीपथावर आहेत. जेव्हा वैज्ञानिक चाचण्या पूर्ण होतील तेव्हा वेगानं उत्पादन होऊन ते लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा याचा आराखडा तयार आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष अभियान

देशातील 100 शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी एका समग्र दृष्टिकोनासह एका विशेष अभियानवर काम सुरु असल्याचं देखील मोदी म्हणाले.

जम्मू काश्मीर आणि लडाख

जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये कार्बन न्यूट्रल विकास मॉडेल राबवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली जात आहेत, असं पंतप्रधानांनी सांगितलं. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेचं काम वेगात चालू आहे. लवकरच तिथे निवडणुका होऊन जम्मू-काश्मीरच्या लोकांना आपला आमदार, आपला मुख्यमंत्री मिळेल, असं मोदी म्हणाले.

कोरोना लस लवकरच – लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांनी सातव्यांदा संबोधन केलं. लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण झालं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत यंदा स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडत आहे. यंदा शाळकरी विद्यार्थ्यांऐवजी 500 NCC कॅडेट सहभागी झाले.

मुलं 20-25 वर्षाची झाली की कुटुंबातले मोठे पण सांगतात, की आता आपल्या पायावर उभा राहा. आत्मनिर्भर हो. आपल्या देशाला पण आता स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाल्यानंतर तसंच आत्मनिर्भर व्हायची गरज आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आम्ही कधीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा माल फेकत राहणार, आणि त्यांच्याकडून तयार वस्तू पुन्हा विकत घेणार. हे कधीपर्यंत चालत राहणार, आपल्याला आत्मनिर्भर व्हावंच लागेल, असं देखील पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

व्होकल फॉर लोकलचा मंत्र –

वोकल फॉर लोकल जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. भारतात मोठया प्रमाणावर होणाऱ्या सुधारणा जग पाहत आहे. त्यामुळेच भारतात होणाऱ्या FDI गुंतवणूकीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. करोना संकटकाळातही भारतात मोठया प्रमाणावर FDI गुंतवणूक झाली आहे, असे मोदी यांनी सांगितले.

एलओसी ते एलएसी –

LOC पासून LAC पर्यंत ज्यांनी देशात्या संप्रुभतेला  धोका निर्माण केला, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. भारताच्या संप्रभुतेच्या रक्षणासाठी संपूर्ण देश संकल्पित आहे. दहशतवाद किंवा विस्तारवाद असो, भारत ठामपणे मुकाबला करत आहे.

दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या संबोधित मिशन गगयान तसेच गेल्यावर्षी तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वयासाठी सीडीएस पदाच्या निर्मितीची घोषणा केली होती. या पदाची आता निर्मिती सुद्धा झाली आहे.