स्वा. सावरकर यांचा अपमान करणार्‍या उर्जामंत्री नितीन राऊत यांचा तीव्र निषेध !

0
389

– टपाल तिकिटांच्या किंमतीवर राष्ट्रभक्तांची किंमत ठरत नसते ! – हिंदु जनजागृती समिती

पिंपरी, दि. 24 (पीसीबी) – स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचा वारंवार अपमान करणार्‍या काँग्रेसच्या उर्जामंत्री नितीन राऊत यांचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध करते. वीर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने तत्कालीन काँग्रेसी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी टपाल तिकीट काढले; मात्र आज त्यांच्याच पक्षाचे मंत्री हे त्यावर टिप्पणी करून आपल्या नेत्यांचा अपमान करत आहेत. जर इंदिरा गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्यापेक्षा माकडाच्या तिकिटाची किंमत अधिक ठेवली, असे मंत्री महोदयांना म्हणायचे असेल, तर काँग्रेसी संस्कृतीत आज देशभक्तांपेक्षा मर्कट उड्या मारणार्‍यांना अधिक महत्त्व का आले आहे, हे त्यातून लक्षात येते. माननीय मंत्रीमहोदय, एखाद्या टपाल तिकिटांच्या किंमतीवर राष्ट्रभक्ताची किंमत ठरत नसते, याचे भान ठेवा, असे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.

राष्ट्रभक्तांची किंमत जर टपाल तिकिटांवर ठरवायची झाली, तर गांधीजींच्या टपाल तिकिटाची किंमत दीड आणा म्हणजे 9 पैसे; मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, कस्तुरबा गांधी यांच्या टपाल तिकिटांची किंमत 15 पैसे आहे. त्या तुलनेत स्वा. सावरकरांच्या टपाल तिकिटांची किंमत 20 पैसे आहे. यातून स्वा. सावरकर यांची किंमत तत्कालीन काँग्रेसी नेत्यांपेक्षा अधिकच आहे. स्वा. सावरकरांची तुलना माकडाशी करणार्‍या उर्जामंत्र्यांनी एकप्रकारे गांधी-नेहरूंच्या तिकिटांचीही तुलना माकडाशी केली आहे, हे त्यांच्या लक्षात येत आहे का ? देशासाठी फार काही जमत नसेल, तर किमान स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आपल्या थोर क्रांतीकारकांचा आदर राखण्याएवढे सौजन्य तरी काँग्रेसी नेत्यांमध्ये असले पाहिजे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध ठाम राहून स्वा. सावरकर अंदमानात शिक्षा भोगण्यासाठी गेले, मात्र येथे मंत्री महोदय स्वतःच्या ‘फेसबुक पोस्ट’विषयीही ठाम रहाण्याचे धाडस दाखवत नाहीत. त्यामुळेच त्यांनी ती पोस्ट लगेच डिलीट करून पळ काढला. मग कोण पळपुटे निघाले ?, असा प्रश्‍नही हिंदु जनजागृती समितीने केला आहे.