स्वातंत्र्य लढ्यामुळेच टिळक लोकमान्य झाले – महापौर ढोरे

0
511

पिंपरी, दि. २ (पीसीबी) : स्वातंत्र्यलढ्यातील लोकमान्य टिळकांचे योगदान मोठे आहेच. मात्र त्यांनी जो लढा दिला तो सुराज्याचा. त्यांच्या लढ्यातून खर्‍या अर्थाने देश स्वातंत्र्याची प्रेरणा अवघ्या राष्ट्राला मिळाली. आणि म्हणूनच ते लोकमान्य झाले, असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

दै. केसरीच्या पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका आणि केसरी मराठा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या टिळक यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, दै. केसरी पिंपरी विभागप्रमुख विजय भोसले, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिका, स्वयंम अस्वार, ज्येष्ठ नागरिक अरूण बकाल, निगडी लायन्स पुना क्लबचे अध्यक्ष मारूती मुसमाडे, ला. विजयसिंह मोहिते-पाटील, कष्टकर्‍यांचे नेते प्रल्हाद कांबळे, पत्रकार मंगेश हाडके आदी उपस्थित होते.

पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, स्वातंत्र्यलढ्यातील टिळकांचे योगदान फार मोठे आहे. जहालमतवादी असलेल्या टिळकांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी फार मोठा संघर्ष करून स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ रोवली.
स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे म्हणाले, इंग्रजांविरूध्द असंतोष निर्माण करण्यासाठी सर्व समाज एकत्र आला पाहिजे. त्यासाठी लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती, मेळे सुरू करून राष्ट्रप्रेम जागृत केले. आणि आजही लोकमान्यांच्या विचाराची समाजाला गरज असल्याचेही सांगून त्यांनी लोकमान्यांना आदरांजली वाहिली.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम सुऱक्षित अंतर ठेवून पार पडला. केसरीचे सुहास मातोंडकर यांनी स्वागत केले तर प्रकाश यादव यांनी आभार मानले.