स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाकडून महानगरपालिकेच्या दवाखान्यांसाठी ५१ जंतुनाशक फवारणी पंप

0
317

निगडी दि. २८ (पीसीबी) : स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती व मंडळाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त मंडळातर्फे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालये व दवाखान्यांकरीता करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणासाठी व पुढेही वापरता येतील असे ५१ सँनिटायझेशन स्प्रे पंप देण्यात आले. सावरकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ नायर यांनी मनपाचे प्रभारी भांडार व्यवस्थापक राजेश निकम यांच्याकडे ते सुपुर्त केले. यावेळी कार्याध्यक्ष भास्कर रिकामे, सचिव प्रदिप पाटील आदि उपस्थित होते. यासाठी श्री. सागर पाटील याचे मोठे सहकार्य लाभले आहे.

सोशल डिस्टसींग व अन्य आरोग्य विषयक नियमांचे पालन करीत स्वातंत्र्यवीर सावरकर सदनमध्ये मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सावरकरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

“करोनासंसर्गामुळे संपूर्ण जगात सकारात्मक रुग्णांची मोठ्या संख्येने भर पडत आहे. शासन, प्रशासन या संसर्गाची साखळी तोडण्याचा, किंबहुना सर्व देश करोनामुक्त करण्यासाठी सर्वच स्तरावर आहोरात्र प्रयत्न करीत आहे. आपल्या मंडळासह अनेक स्वयंसेवक या कार्यात हिरिरीने भाग घेत आहेत. असे असले तरी सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून स्वयंस्फूर्तीने आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, तसेच वयैक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छता राखून आपले शहर लवकरात लवकर करोना मुक्त करुन पुणे शहराच्या नावलौकीक वाढवावा. हिच स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली राहील.” असे आवाहन भास्कर रिकामे यांनी यावेळी मंडळाच्या वतीने शहरवासीयांना केले.

यावेळी सहसचिव रमेश बनगोंडे, अवधूत अमराळे, संतोष आमले ही मोजकी मंडळी उपस्थित होती.
संध्याकाळी मंडळाचे पदाधिकारी विश्वास करंदीकर यांचे न उमगलेले सावरकर या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान फेसबुकवर लाइव्ह वर प्रसारित करण्यात आले.