स्वाइन फ्लूची लस घेण्याबाबत डॉक्टरच उदासीन

0
355

मुंबई, दि. २० (पीसीबी) – स्वाइन फ्लूची लागण होण्याची शक्यता अधिक असलेल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येच त्याची प्रतिबंधात्मक लस घेण्याबाबत उदासिनता असल्याचे केईएमच्या संशोधनात्मक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

केईएम रुग्णालयातील २७२ डॉक्टरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ९८ टक्के डॉक्टरांनी लसीकरणामुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग होण्याचा धोका कमी असल्याचे म्हटले आहे. मात्र केवळ २९ टक्के डॉक्टरांनीच लस घेतली असल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्यात जानेवारीपासून १५९ जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्राधान्याने लसीकरण करून घेणे अत्यावश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही म्हटले. त्यानुसार २०१५ पासून दरवर्षी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम राबवली जाते. केईएम रुग्णालयात २०१७मध्ये राबवलेल्या लसीकरण मोहिमेचा अभ्यास रुग्णालयातील ‘कम्युनिटी मेडिसीन’ विभागाने केला आहे. ‘जर्नल ऑफ एज्युकेशन अ‍ॅण्ड हेल्थ प्रमोशन’ या नियतकालिकामध्ये तो प्रसिद्ध झाला आहे.

बालरोग, औषधशास्त्र, शल्यचिकित्सा यांसह रुग्णालयातील १२ विभागांमधील २७२ डॉक्टरांचे लसीकरण आणि उपचाराबाबतचे मत जाणून घेण्यात आले. ‘कम्युनिटी मेडिसीन’ विभागाच्या ५२ टक्के, औषधशास्त्रच्या २८ टक्के, बालरोगच्या ३६ टक्के आणि मानसिक आरोग्य विभागातील ६० टक्के डॉक्टरांनी लसीकरण करून घेतले. अस्थिभंग आणि भूलशास्त्र विभागातील एकाही डॉक्टरने लसीकरण केले नाही. विशेष म्हणजे स्त्रीरोग विभागातील केवळ ०.७ टक्के  डॉक्टरांनी ही लस घेतली आहे.