स्वयंगोल होऊनही ब्लास्टर्सने ईस्ट बंगालला रोखले

0
312

बांबोळी (गोवा), दि.२० (पीसीबी) – हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमातील पहिल्या विजयाची मातब्बर ईस्ट बंगालची प्रतिक्षा आजही कायम राहिली. स्वयंगोलची साथ मिळूनही केरला ब्लास्टर्सविरुद्ध ईस्ट बंगालला 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. मध्य फळीतील बदली खेळाडू जेकसन सिंग याने सहा मिनिटांच्या भरपाई वेळेतील पाचव्या मिनिटाला सनसनाटी गोल करीत ब्लास्टर्सला एक गुण मिळवून दिला. त्यामुळे सुपर संडेची दुसरी लढत रंगतदार ठरली.

बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. बचाव फळीतील बुर्किना फासोचा 32 वर्षीय खेळाडू बाकारी कोने याच्याकडून तेराव्याच मिनिटाला स्वयंगोल झाला. त्यामुळे ईस्ट बंगालकडे मध्यंतरास 1-0 अशी आघाडी होती. त्यानंतर भरपाई वेळेत मणीपूरचा 19 वर्षीय फुटबॉलपटू जेकसन याने ब्लास्टर्सला तारले. उजव्या बाजूला ब्लास्टर्सला कॉर्नर मिळाला. फॅक्युंडो पेरीरा याने घेतलेल्या कॉर्नरवरील चेंडूला बदली खेळाडू साहल अब्दुल समद याने टिपले. त्याने गोलक्षेत्रात क्रॉस शॉट मारताच जेकसन याने उडी घेत हेडिंगवर ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजीत मजुमदार याला चकवले. ब्लास्टर्ससाठी गोलरक्षक अल्बिनो गोम्स याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे बरोबरीच्या आशा कायम राहिल्या, ज्या दोन बदली खेळाडूंनी पूर्ण केल्या.

लिव्हरपूलचे मातब्बर खेळाडू रॉबी फाऊलर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ईस्ट बंगालसाठी हा निकाल त्यांच्या निराशेत भर काढणारा ठरला. ईस्ट बंगालला सहा सामन्यांत दुसरी बरोबरी पत्करावी लागली असून, त्यांनी चार सामने गमावले आहेत. दोन गुणांसह त्यांनी अखेरच्या अकराव्या स्थानावरून एक क्रमांक प्रगती केली. आता ओडिशा अखेरच्या स्थानावर गेला. ब्लास्टर्सचीही विजयाची प्रतिक्षा लांबली. सहा सामन्यांत तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे तीन गुण झाले. त्यांचे नववे स्थान कायम राहिले.

सहभागी 11 संघांमध्ये ब्लास्टर्स, ईस्ट बंगाल आणि ओदिशा या तीन संघांना अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. मुंबई सिटी एफसी सात सामन्यांतून 16 गुणांसह आघाडीवर आहे. एटीकेएमबी सहा सामन्यांतून 13 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावरील बेंगळुरूचे सहा सामन्यांतून 12 गुण आहेत. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी सात सामन्यांतून दहा गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.ईस्ट बंगालला मोसमातील तिसराच गोल नोंदवण्यात नशीबाची साथ मिळाली. मध्यरक्षक जॅक्स मॅघोमा याने मध्य फळीतील सहकारी महंमद रफीक याला धुर्तपणे पास दिला. गोलक्षेत्रात असलेला रफीक मध्यरक्षक अँथनी पिल्कींग्टन याला पास देण्याच्या प्रयत्नात होता. रफीकने मैदानालगत फटका मारताच चेंडू रोखण्यासाठी ब्लास्टर्सचा बचावपटू कोने याने मैदानावर झेप टाकली, पण चेंडू त्याच्या पायाला लागून ब्लास्टर्सच्या नेटमध्ये गेला. त्यावेळी ब्लास्टर्सचा गोलरक्षक अल्बिनो गोम्स हा सुद्धा चकला.

पहिला प्रयत्न ईस्ट बंगालने तिसऱ्या मिनिटाला केला. पिल्कींग्टन याने चेंडूवर ताबा मिळवून गोलक्षेत्रालगत मध्यरक्षक मॅट्टी स्टेनमन याला पास दिला. स्टेनमनने मारलेला फटका सहकाऱ्याकडून ब्लॉक झाल्यानंतर गोम्सने अडवला. नवव्या मिनिटाला ईस्ट बंगालचा मध्यरक्षक हाओबाम सिंग याचा प्रयत्न गोम्सने चपळाईच्या जोरावर अपयशी ठरवला. अकराव्या मिनिटाला ब्लास्टर्सला उजवीकडे कॉर्नर मिळाला. पेरीराने गोलक्षेत्रात चेंडू मारला. कोस्टा न्हामोईनेस्कू याने अखेरच्या क्षणी धावत येत हेडिंग केले, पण चेंडू थोडक्यात क्रॉसबारवरून गेला. 16व्या मिनिटाला मॅघोमाने गोलक्षेत्रालगत पास दिल्यानंतर पिल्कींग्टनने प्रयत्न केला, पण गोम्सने उडी घेत हाताने चेंडू बाहेर घालवला. पहिल्या सत्राच्या 44व्या मिनिटास पेरीराने मध्य क्षेत्रातून आगेकूच केली. त्याचा पास मिळवण्यासाठी के. पी. राहुल वेगाने धावला, त्याचवेळी ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजीत मजुमदार पुढे सरसावला. त्याने चेंडू हाताने थोपवला. यात मजुमदारला किरकोळ दुखापत झाली. दुसऱ्या सत्रात 51व्या मिनिटाला ब्लास्टर्सला कॉर्नर मिळाला. आघाडी फळीतील फॅक्युंडो पेरीरा याने बाकारी कोने याने उडी घेत हेडिंग केले, पण चेंडू नेटच्या बाहेरील बाजूला लागला. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात ब्लास्टर्सच्या मध्यरक्षक साह अब्दुल समद आणि मॅघोम यांचे प्रयत्न अपयशी ठरल्याने त्यांना विजयासाठी दूर रहावे लागले.