Pimpri

“स्वच्छतेतून देशभक्ती करता येईल!”

By PCB Author

January 23, 2022

पिंपरी (दिनांक : २३ जानेवारी २०२२) “स्वच्छतेच्या माध्यमातून समरसता, समरसतेतून संघटन आणि संघटनेतून देशभक्ती करता येईल!” असे विचार विश्व हिंदू परिषद मुंबई क्षेत्र संघटनमंत्री श्रीरंग राजे यांनी खिंवसरा पाटील शैक्षणिक संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे शनिवार, दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी व्यक्त केले. समरसता स्वच्छता सप्ताहनिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आणि विश्व हिंदू परिषद (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) सत्संग विभाग आयोजित स्वच्छतादूत सन्मान सोहळ्यात राजे यांच्या हस्ते विविध स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य निरीक्षक आणि ‘स्वच्छ भारत मिशन’ अधिकारी सुरेश चन्नाल, ज्येष्ठ स्वच्छता कर्मचारी सफेदी खुशाल वाल्मीकी, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, मुख्याध्यापक नटराज जगताप, प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते नागनाथ बोगंरगे, धनाजी शिंदे, मुकुंद चव्हाण, विवेक सोनक, नितीन वाटकर, प्रज्ञा सावंत, सामाजिक कार्यकर्ते नितीन बारणे, पालिका कर्मचारी अरुण राऊत, प्रशांत पवार, अभय दारोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विश्वास कांबळे, करण कुडमल, नरोत्तम चावरिया, अनिल डोंगरे, संतोष सूर्यवंशी, शोभा जेधे, सूर्यकांत मोहिते, निशा लोधे, नंदा वायकर, नरेंद्र सरोदे, बायडाबाई पवार, शिवाजी पोळ या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह, ग्रंथ आणि दिनदर्शिका प्रदान करून हृद्य गौरव करण्यात आला. याप्रसंगी अश्विनी गोडावले या युवतीने सत्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना, “आमच्या कामामुळे समाज आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतो या गोष्टीचा मला एक स्वच्छता कामगार म्हणून अभिमान वाटतो!” अशी भावना व्यक्त केली; तर आरोग्य निरीक्षक शुभम कुपटकर यांनी, “कचरा संकलन, विभाजन करण्यासाठी पालिका लाखो रुपये खर्च करते. नागरिक प्लास्टिकच्या बाटलीत घरातील प्लास्टिक कचरा संकलित करू शकतो. या साठवलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर करता येतो!” असे सांगून याविषयीचे प्रात्यक्षिक उपस्थितांना दाखवले. सुरेश चन्नाल म्हणाले की, “प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील ओला आणि सुका कचरा घरातच कुजवून खतनिर्मिती केल्यास वाढत्या कचऱ्याच्या समस्येला मोठ्या प्रमाणावर आळा बसेल; तसेच ‘स्वच्छ भारत २०२२’च्या सर्वेक्षणात देश पातळीवर पिंपरी-चिंचवड हे शहर प्रथम क्रमांक मिळवू शकेल!” श्रीरंग राजे पुढे म्हणाले की, “आपला जीव धोक्यात घालून स्वच्छतादूत हे दररोज समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. कोणतेही काम हे हलक्या दर्जाचे नसते. पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे प्रत्येक वेळी नवी गोष्ट वापरण्याचा मोह होतो आणि परिणामी मोठ्या प्रमाणावर अनावश्यक कचरा वाढतो. यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून संयमित जीवन जगावे!” खिंवसरा पाटील विद्यालयाच्या महिला अध्यापकांनी स्वागतगीत म्हटले. नागनाथ बोगंरगे यांनी प्रास्ताविक केले. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सतीश गोरडे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली