स्मिथचे शतक, ऑस्ट्रेलियाची मजल ३३८ धावांची

0
231

सिडनी, दि. ८ (पीसीबी) : पहिल्या दिवशी अपयश आल्यानंतर तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दोन सत्रात भारताने वर्चस्व राखले. ऑस्ट्रेलियाचा शैलीदार फलंदाज स्टिव स्मिथ याने शतक झळकावल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव आज ३३८ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यानंतर भारताने चहापानापर्यंत बिनबाद २६ अशी भक्कम सुरवात केली. शुभमन गदिल १४, तर रोहित शर्मा ११ धावांवर खेळत होता.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रातील एखाद दुसऱ्या पावसाच्या सरी नंतर पार पडलेल्या खेळात स्मिथच्या शतकी खेळाची चर्चा झाली. एकदिवसीय सामन्यातील यशानंतर कसोटी क्रिकेटमध्ये यश त्याच्यावर रुसले होते. मात्र, या कसोटीत त्याने आपली लय पुन्हा मिळवली आणि कारकिर्दीमधील २७वे कसोटी शतक साजरे केले. त्याचा कालचा नाबाद सहकारी मार्नस लाबुशेन (९१) शतकापासून वंचित राहिला. या जोडीच्या प्रतिकारानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर फिके पडले.

चेंडू जुना असेपर्यंत अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकी जोडीने मारा केला. चेंडू थांबून येत असल्याने फलंदाजाला खेळणे सोपे जात होते. मात्र, फिरकी गोलंदाजांना सतत बॅकफूटवर खेळण्याची चूक लाबुशेनला महागात पडली. जडेजाच्या एका उंची मिळालेल्या चेंडूंवर बॅकफूटवर खेळताना बॅटची कड घेतलेला चेंडू स्लिपमध्ये रहाणेच्चा सुरक्षित हाती विसावला. लाबुशेन ९१ धावांवर बाद झाल्यावर ऑस्ट्रेलिया डावात घडले ते फक्त स्मिथचे शतक. खेळपट्टीवर टिकल्यावर धावा करायच्या असतात हे त्यांचे फलंदाज विसरून गेले. कॅमेरून ग्रीन २२ चेंडू खेळल्यानंतरही खाते उघडू शकला नाही. कर्णधार टिम पेन, पॅट कमिन्स यांनीही धावा करण्याचा प्रयत्नच केला नाही. मॅथ्यू वेडला अतिघाई महागात पडली. अशा वेळी मिशेल स्टार्कने स्मिथला साथ दिल्याने ऑस्ट्रेलियाला समाधानकारक मजल मारता आली. स्मिथनेही शतकासाठी खूप चेंडू घेतले. त्यामुळे ९९ वरून शतक पूर्ण करण्याची प्रतिक्षा चांगलीच ताणली गेली होती. शथकानंतर स्मिथने आक्रमक खेळायला सुरवात केली. एकेरी धाव घेतल्या दुसरी धाव चोरण्याच्या नादात तो जडेजाच्या थेट फेकीने धावबाद झाला.

पहिला दिवस अपयशी गेल्यानंतरही आज भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. नव्या चेंडूवर भारतीय गोलंदाजांनी यश मिळविले. पण, लक्षात राहिला तो जडेजाचा स्पेल. त्याने १८ षटकांत ६२ धावांत ४ गडी बाद केले.