‘स्मार्टसिटी’मुळे नवउद्योजकांना अनेक संधी उपलब्ध झाल्या – डॉ. राजेंद्र जगताप

0
492

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – “स्मार्टसिटी या संकल्पनेत तंत्रज्ञान आणि कौशल्याचा अंतर्भाव असल्याने नव उद्योजकांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. तरुणांनी तसे ज्ञान आत्मसात करून या संधीचा लाभ घेतला पाहिजे. टाकाऊतून टिकाऊ, स्वच्छ वातावरण निर्मिती आणि सौर ऊर्जेचा वापर वाढवणे यावर उद्योजकांनी नवीन कल्पना दिल्यास त्या स्मार्टसिटीला उपयुक्त ठरतील,” असे मत पुणे स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केले.

आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये (डिवायपीआयएमएस) आयोजित उद्योजकता विकास शिबिरात डॉ. जगताप बोलत होते. यावेळी ‘मिटकॉन’चे संस्थापक डॉ. प्रदीप बावडेकर, उद्योजिका शिल्पा जोशी, मनाली शेनॉय, आलोक नायर, संस्थेचे संचालक डॉ. आशुतोष मिसाळ, सल्लागार संचालक प्रा. डी. आर. करनुरे, हेड कॉर्पोरेट रिलेशनचे डॉ. जयसिंग पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. प्रदीप जावडेकर म्हणाले, “आपण स्वतःतील क्षमतांचा विचार करायला पाहिजे. कोणत्याही एका क्षेत्रांमध्ये नैपुण्य मिळवले पाहिजे. सर्व क्षेत्रात आपण करू शकूच असे नाही. त्यामुळे आपल्या आवडीच्या आणि शक्य असलेल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून त्यानुसार आपल्यातील उद्योजक घडवला पाहिजे. उद्योग करताना आपल्यात झपाटलेपण असणे आवश्यक असते”, असे त्यांनी यावेळी सांगितले.