स्फोटके प्रकरणी जालन्यातील माजी नगरसेवकाच्या फार्महाऊसवर एटीएसची धाड

0
1204

जालना, दि. २७ (पीसीबी) – वैभव राऊतसह त्याच्या सहकार्‍यांच्या अटकेनंतर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) त्यांच्या रॅकेटची पाळेमुळे शोधण्यास सुरुवात केलेली आहे. श्रीकांत पांगारकरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर रविवारी (दि.२६) दहशतवादविरोधी पथकाने जालन्यापासून १० किमी अंतरावरील रेवगावातील जालन्याचा माजी नगरसेवक खूशालसिंग ठाकूरच्या फार्महाऊसवर धाड टाकली. याच फॉर्महाऊसवर पांगारकरने बॉम्बनिर्मिती, पिस्तूल चालवण्याचा सराव केल्याची माहिती चौकशीत अधिकार्‍यांना दिली होती. त्यानंतर त्याला सोबत घेऊनच दहशतवादविरोधी पथकाने ही धाडीची कारवाई केली आहे.

२०१४ पूर्वी भाजपचा नगरसेवक असलेला खुशालसिंग ठाकूर सनातनचा साधक, जिल्ह्यात विश्‍व हिंदू परिषदेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी निगडीत असलेला व्यक्ती म्हणून त्याची ओळख होती. खुशालसिंग ठाकूरने २०१४ सालात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढविली होती. सध्या अंदाजे ६५ वर्ष वय असलेला खुशालसिंग ठाकूर यांची जालन्यातील राजूर रोड परिसरात २२ एकर बागायती शेती आहे. त्यांच्याच रेवगावच्या फार्महाऊसवर पांगारकरने बॉम्ब तयार केल्याचा खुलासा तपासात झाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने तेथे ही धाड टाकली. या धाडीच्या वेळी पथकाने श्रीकांत पांगारकरलाही सोबत नेले होते. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही झडती सुरु होती. या फार्महाऊसवरील शेळ्यांचा गोठा सुद्धा या कर्मचार्‍यांनी बराचवेळ तपासला होता. त्यानंतर रेवगावपासून ३ कि.मी. अंतरावरील सारवाडी ते पोकळवडगाव दरम्यान रेल्वे रुळाजवळच्या तलावात दडवलेले बॉम्ब निर्मितीचे साहित्यही या पथकाच्या हाती लागल्याचे सांगण्यात आले.