‘स्पर्श’च्या संचालकांवरही फौजदारी गुन्हे दाखल करा – बोगस कोरोना सेंटरमधील 3 कोटी 28 लाख रुपयांच्या लुट प्रकरणी संदिप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी

0
341

पिंपरी, दि.१२ (पीसीबी) – भोसरीतील बनावट कोरोना सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल न करता 3 कोटी 28 लाख रुपयांचे बिल काढून महापालिकेची लूट करणाऱ्या स्पर्श हॉस्पिटल संचलकांवरही फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना प्रत्यक्ष भेटून संदीप वाघेरे यांनी आज लेखी निवेदन दिले.

आपल्या निवेदनात संदिप वाघेरे म्हणतात, मी या महापालिकेचा विश्वस्त म्हणून लूट करणाऱ्यांच्या विरोधात दाद मागतो आहे. पिंपरी-चिंचवड महानरपालिकेने स्पर्श हॉस्पिटलच्या ऑटोक्लस्टर कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी बाहेरील हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संगनमत करून कोरोना रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचा गुन्हा दाखल आहे. चार डॉक्टरांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. याच स्पर्श हॉस्पिटलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी एका कर्मचार्‍यावरही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस आयुक्तांनी कारवाई केल्याने स्पर्श हॉस्पिटलकडून ऑटोक्लस्टर येथील काम काढून घेतल्या बद्दल महापालिका आयुक्त राजेश पाटील आपले व पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे सर्वप्रथम अभिनंदन. मात्र, आता थोडे पुढे जाऊन खोलात तपास करून मूळ सूत्रधारांवर कारवाई केली पाहिजे.

स्पर्श हॉस्पिटलने मागील वर्षी कोरोना महामारीच्या काळात भोसरी येथील रामस्मृती मंगल कार्यालयात व हिरा लॉन्स येथील कोविड सेंटरमध्ये बोगस डॉक्टर्स व नर्सेस, आदि स्टाफ दाखवून त्या दोन्ही कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल न होता सुमारे 5 कोटी 14 लाख रुपयांचे बिल महापालिकेला दिले होते. त्यापैकी 65 टक्के म्हणजे सुमारे 3 कोटी 28 लाख रुपयांचे बिल काहीहीं काम न करता स्पर्शला मिळाले. महापालिकेची त्यांनी अक्षरशः लुट केली आहे. आता या प्रकरणाची राज्य शासनाचा ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी नेमूण सखोल चौकशी करावी. तसेच; या प्रकरणात कोट्यावधींचा लाभ घेणारे स्पर्श हॉस्पिटलचे संचालक व या प्रकरणी त्यांना भ्रष्टाचार करण्यास मदत करणारे महापालिकेचे संबंधीत अधिकारी यांच्यावर जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या पैशाची कोरोना काळात लुट केल्याबद्दल फौजदारी स्वरुपाचे फसवणुकचे गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी केली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी पुर्ण होत नाही तोपर्यंत स्पर्श हॉस्पिटलला जुन्या कामाबद्दल एकही रुपया बिल अदा करु नये. जुन्या बिलातील जादा लुटलेल्या वसूल पात्र रकमा चौकशी नंतर वसूल कराव्यात. हॉस्पिटलला काम देताना निविदेतील तरतूदीपैकी जेवढा स्टाफ, डॉक्टर्स होता तेवढा स्टाफ व डॉक्टर्स त्या ठिकाणी नव्हता. परंतु; त्यांनी बिल पुर्ण संख्येने घेतलेले आहे. त्यामुळे जेवढा स्टाफ व डॉक्टर्स कामावर तेवढेच बिल देवून उर्वरीत प्रकरणी दंडात्मक कारवाई करावी. काम दिल्याच्या पहिल्या दिवसापासूनची जादा बिलांची वसूली करावी. या प्रकरणी महापालिकेची प्रचंड बदनामी झाल्याने स्पर्श हॉस्पिटलला कायमस्वरुपी काळ्या यादित टाकावे, असे
नगरसेवक संदिप वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे.