Banner News

स्थायीच्या अध्यक्षपदाचा लोकाभिमुख कामांसाठी उपयोग करणार – ममता गायकवाड

By PCB Author

April 07, 2018

स्थायी समिती अध्यक्षपद हे शहर विकासाचे निर्णय घेण्याचे महत्त्वाचे पद आहे. या पदाचा उपयोग शहरात लोकाभिमुख प्रकल्प राबविण्यासाठी करणार असल्याची ग्वाही स्थायी समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा ममता गायकवाड यांनी बुधवारी (दि. ७) दिली.

ममता गायकवाड यांची पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या ३४ व्या अध्यक्षा म्हणून निवड झाली. या पदावर निवड झालेल्या त्या दुसऱ्या मागासवर्गीय महिला आहेत. निवडीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना शहर विकासासाठी पदाचा वापर करणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, स्थायी समितीच्या मावळत्या अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आमदार महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड म्हणाल्या, “भाजपने माझ्यावर विश्वास दाखविला आहे. माझ्या पक्षाने दाखविलेला हा विश्वास मी सार्थ करून दाखविणार आहे. महापालिकेत प्रथमच सत्ता स्थापन केल्यानंतर पक्षाने गेल्या वर्षभरात शहर विकासाचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. समाविष्ट गावांतील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पावले उचलली आहेत. शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश आहे. या योजनेला गती देण्याची जबाबदारी माझ्यावर असणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील जास्तीत जास्त बेघरांना घरे देण्याचा प्रयत्न असेल. निगडीपर्यंत मेट्रो करण्यासाठी निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.”

दरम्यान, स्थायी समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा ममता गायकवाड या प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्या वाकड-पिंपळेनिलख प्रभागाच्या नगरसेविका आहेत. त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झालेले आहे. त्या मूळच्या सातारा जिल्ह्यातील आहेत.