स्टीव्ह स्मिथ हा कायम ‘चीटर’ म्हणूनच ओळखला जाईल- हार्मिसन

0
688

लंडन, दि. ९ (पीसीबी) – ‘स्टीव्ह स्मिथ कितीही चांगले क्रिकेट खेळला तरी चेंडू कुरतडण्याच्या त्याच्या कृतीमुळे तो क्रिकेटच्या इतिहासात नेहमी एक ‘चीटर’ म्हणूनच ओळखला जाईल,’ अशी बोचरी टीका इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसन याने केली आहे.

ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्ये सध्या अॅशेज क्रिकेट मालिका सुरू आहे. मालिकेतील चौथ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव करत २-१ अशी आघाडी घेतली. स्टीव्ह स्मिथने इंग्लंडच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. त्या पार्श्वभूमीवर रेडिओला दिलेल्या एका मुलाखतीत हार्मिसन याने ही टीका केली.

‘स्मिथला कधी माफ केले जाईल असे मला वाटत नाही. एकदा तुमच्यावर विश्वासघाताचा शिक्का पडला की तीच तुमची ओळख होऊन जाते. स्मिथ, वॉर्नर आणि कॅमेरून या तिघांच्या बायोडाटामध्ये ‘विश्वासघात’ हा शब्द समाविष्ट झाला आहे. अंतिम क्षणापर्यंत ही ओळख त्यांच्यासोबत राहील. स्मिथने काहीही करो, त्याची आठवण दक्षिण अफ्रिकेतील त्या कृत्यासाठीच काढली जाईल,’ असे हार्मिसन म्हणाला.