सौदी अरेबियात दोन भारतीयांचा शिरच्छेद; आपल्याच सहकाऱ्याची केली होती हत्या

0
572

सौदी अरेबिया, दि. १७  (पीसीबी) – आपल्याच भारतीय सहकाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी होशियारपूरच्या सत्विंदर कुमार आणि लुधियानाच्या हरजीत सिंग या दोघांचा सौदी अरेबियात शिरच्छेद करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती भारतीय दुतावासाने दोघांच्याही कुटुंबीयांना दिली आहे. शिरच्छेद झाल्यावर सौदी प्रशासनाने यासंदर्भात भारत सरकारला काहीही कळवले नव्हते.

हरजीत ,सत्विंदर आणि इमामुद्दीन या तिघांनी सौदीतील हायवेवर लुटमार केली होती. पैशांच्या वाटपावरून भांडण झाल्यामुळे त्यांनी इमामुद्दीनची हत्या केली होती. काही दिवसांनंतर हरजीत सिंग आणि सत्विंदर कुमार यांना दारू पिऊन मारामारी केल्याप्रकरणी सौदी पोलिसांनी अटक केली होती. त्यांना भारतात परत पाठवण्याचीच तयारी सुरु असताना त इमामुद्दीन या त्यांच्या भारतीय सहकाऱ्याची हत्या केल्याचे उघडकीस आले.

दोघांनाही तातडीने रियाधला हलवण्यात आले. त्यांच्यावर चालवण्यात आलेल्या खटल्यावर भारतीय दुतावासाचे लक्ष होते. फेब्रुवारीत त्यांना शिरच्छेदाची शिक्षा सुनावण्यात आली. २८ फेब्रुवारी २०१९ला त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. पण याची माहिती मात्र भारतीय दुतावासाला देण्यात आली नाही.

सत्विंदरची काहीच खबरबात न मिळाल्याने त्याची पत्नी सीमारानी हिने परराष्ट्र मंत्रालयात अर्ज दाखल केला. यानंतर भारतीय दुतावासाने सौदी प्रशासनाशी संपर्क साधून मृत्यूदंडाची माहिती मिळवली. दोघांचेही मृतदेह मिळवण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला. पण सौदी कायदा याची परवानगी देत नसल्यामुळे सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने मृतदेह भारतात पाठवण्यास नकार दिला.