सोहराबुद्दीन व त्याचा साथीदार प्रजापती चकमक कटात अमित शहा होते?

0
524

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – ‘कथित गुंड सोहराबुद्दीन शेख व त्याचा साथीदार तुलसीराम प्रजापती यांच्या कथित बनावट चकमकीचा कट रचणाऱ्यांमध्ये मुख्यत्वे भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि डी.जी. वंजारा, राजकुमार पांडियन व एम. एन. दिनेश हे तीन आयपीएस अधिकारी होते. मात्र, हा आरोप सिद्ध करणारा कोणताही कागदोपत्री पुरावा नव्हता’, असे सीबीआयचे मुख्य तपास अधिकारी संदीप तामगडे यांनी बुधवारी विशेष सीबीआय न्यायाधीश एस. जे. शर्मा यांच्यासमोर दिलेल्या साक्षीत सांगितले. दरम्यान, सरकारी पक्षाच्या सर्व साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाली असल्याचे गुरूवारी सीबीआयतर्फे न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. आता सोमवारपासून न्यायालयाकडून  आरोपींचे जबाब नोंदवले जाणार आहेत.

प्रजापतीला राजकीय व गुन्हेगारीच्या संबंधातून ठार करण्यात आल्याचे कॉल डेटा रेकॉर्डच्या पुराव्यातून समोर आले होते. तसेच अहमदाबादमधील एका बिल्डरच्या कार्यालयावर गोळीबार करण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सोहराबुद्दीन व प्रजापतीचा वापर करून घेतल्याचे दाखविणारेही पुरावे होते’, असे मुख्य तपास अधिकारी संदीप तामगडे यांनी विशेष सीबीआय न्यायालयातील उलटतपासणीदरम्यान विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांत सांगितले.

सोहराबुद्दीन व त्याची पत्नी कौसरबी यांची सन २००५मध्ये कथित बनावट चकमकीत करण्यात आलेली हत्या आणि २००६मध्ये सोहराबुद्दीनचा साथीदार तुलसीराम प्रजापती याची कथितरीत्या करण्यात आलेली हत्या याप्रकरणी सध्या गुजरात व राजस्थानमधील २१ पोलिसांसह २२ जणांविरोधात खटला सुरू आहे. या प्रकरणातून भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरच आयपीएस अधिकारी वंजारा, पांडियन व दिनेश यांना सीबीआय न्यायालयाने यापूर्वीच आरोपमुक्त केलेले आहे. सीबीआयतर्फे या खटल्यात नोंदवण्यात आलेल्या २१० साक्षीदारांपैकी जवळपास ६० टक्के साक्षीदार फितूर झालेले आहेत. संदीप तामगडे यांची साक्ष बुधवारच्या सुनावणीत नोंदवण्यात आली.